शेरखान शेख
रांजणगाव गणपती, (पुणे) : पहाटेच्या सुमारास पायी चाललेल्या नागरिकांना सणसवाडी (ता. शिरुर) ग्रामपंचायत हद्दीत कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याला शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे.
श्रीकांत मिनिनाथ मारणे (वय २८, रा. शंकर मंदिर जवळ कोथरूड, पुणे), रोहित बाबुराव पवार (वय १८, रा. धायरी फाटा पुणे), गणेश नितीन जावडेकर (वय १८, रा. रासकर मळा, जनता वसाहत पर्वती, पुणे), जितेंद्र शंकर चिंधे (वय ३१, रा. जांभळवाडी, दत्तनगर कात्रज, पुणे), अनिकेत अनिल वाघमारे वय २२, रा. नंदनवन कॉलनी, कोथरूड पुणे), असे अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हिमांशू ब्रिजेशकुमार पाटील (वय – २०, रा. सणसवाडी ता. शिरुर, मूळ रा. तिगजा ता. मेजा जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ०६) सणसवाडी येथील एल & टी फाटा येथून हिमांशू पाटील, शिवा पटेल व कृष्णकांत आदिवासी हे तिघेजण पहाटेच्या सुमारास घरी निघाले होते. यावेळी पाठीमागून दोन दुचाकीहून पाच युवक त्यांच्याजवळ आले. यातील एका युवकाने हिमांशूच्या गळ्याला कोयता लावून शिवीगाळ व दमदाटी केली. तर दुसऱ्या युवकाने शिवा व कृष्णकांत यांना कोयता दाखवून शिवीगाळ, दमदाटी करत हालचाल केली तर मारून टाकू असे म्हणून हाताने मारहाण करत त्यांच्या जवळील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेहली. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली कि, पुणे नगर महामार्गालगत निमगाव म्हाळुंगी फाटा येथे काही युवक असून त्यांच्याकडे कोयता आहे. पोलिसांनी तातडीने सदर ठिकाणी जात युवकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल तसेच कोयते मिळून आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सणसवाडी येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहे.
सदरची कामगिरी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे, शिवाजी चीतारे, शंकर साळुंके, अमोल दांडगे, रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, अविनाश पठारे यांच्या पथकाने केली आहे.