मुंबई : ‘ऑनलाइन जुगार व गेम्सच्या माध्यमातून खेळाडूंनी गेल्या तीन वर्षांत तब्बल ५८ हजार कोटी जिंकले आहे. हे गेमर्स आता आयकर विभागाच्या रडारवर आहे. खेळाडूंना बक्षिसापोटी मिळविलेली रक्कम स्वतःहून जाहीर करत त्यावर लागू असलेल्या कराचा भरणा करावा. अन्यथा त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे.
देशात सुमारे ८० लाख लोक नियमित ऑनलाइन गेम खेळतात. या गेमर्सने गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून बक्षिसापोटी तब्बल ५८ हजार कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे. मात्र, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांचा आर्थिक व्यवहार, त्याद्वारे त्यांच्याकडून भरला गेलेला जीएसटी आणि बक्षिसांचे केलेले वितरण आणि त्याद्वारे खेळाडूंकडून अपेक्षित असलेला आयकर याचा मेळ बसत नाही. यामुळे लाखो लोकांनी कर चुकाविल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयकर विभागाने ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, ऑनलाइन गेम्स प्रकारावर कंपन्यांना जीएसटी भरावा लागतो. तर जे ग्राहक या खेळातून बक्षिसापोटी पैसे मिळवतात, त्या रकमेवर ३० टक्के कराची आकारणी करण्याची तजवीज आयकर कायद्यामध्ये आहे. मात्र, ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्या लाखो लोकांनी बक्षिसे जिंकूनही कर भरणा केला नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे.