पाचगणी : शिक्षक हा समाज आरसा असतो. समाज परिवर्तन करणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. असे प्रतिपादन पाचगणी येथील भारती विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक शहाजी सावंत यांनी केले आहे.
शिक्षक दिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ हायस्कूल येथे शिक्षक दीन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरील प्रतिपादन सावंत यांनी केले आहे.
यावेळी शिक्षक दिनानिमित्त शिक्षक झालेल्या दहावीच्या मुलींचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या कार्याची माहिती मनोगतातून व्यक्त केली. यावेळी कुमार कांबळे, रमेश देशमुख, पुष्पलता माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर या कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी प्रतीक्षा मालुसरे हिने मानले.