पुणे, ता.०४ : जून-जुलै महिन्यातील पूर व अतिवृष्टीमुळे पिके व शेतजमिनींचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ १,०७१ कोटींचा निधी मंजूर केला. तर आनंदाचा शिधा वाटपात पोहे आणि मैद्याचा समावेश झाल्याने सामान्य कुटुंबांचे दिवाळीचे दिवस अधिक आनंदाचे होणार आहेत, असा आशावाद उत्तर पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केला. जनतेच्या हितासाठी संवेदनशील असलेल्या महायुती सरकारचे भाजप अभिनंदन करत आहे , असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
यंदाच्या दिवाळीनिमित्त वितरित होणाऱ्या आनंदाचा शिधा संचात रवा, चणाडाळ, साखर व खाद्यतेलासोबत मैदा आणि पोहे यांचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असून, शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयात १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्यात येणार आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सणासुदीचे दिवस गोड होणार असून, आपत्तीग्रस्त बळीराजालाही दिलासा मिळणार आहे, असे शरद बुट्टे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
जून-जुलै २०२३ या दोन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या आणि शेतजमिनीच्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने १ हजार ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यातील १४ लाख ९ हजार ३१८ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागणार नाहीत, अशी माहितीही त्यांनी या पत्रकाद्वारे दिली आहे.
तसेच मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीची रक्कम याबाबतचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असेही बुट्टे पाटील यांनी स्पष्ट केले. जनहिताच्या प्रश्नावर संवेदनशीलता आणि शासकीय व्यवहारांत पारदर्शकता यामुळे महायुती सरकार हे आदर्श सरकार ठरले आहे. भाजपला त्याचा अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.