अजित जगताप
सातारा : शिक्षक दिनाच्या अनुषंगाने गौरी गणपतीच्या सणानिमित्त शिक्षणमाता सावित्रीबाई फुले यांचा आदर्श तसेच वाहतूक सुरक्षा संदेश व शेतकरी कुटूंबाची नाळ जोडलेल्या बैलगाडी शर्यत देखाव्याने खटाव तालुक्यातील वडूज येथील कर्मवीर नगर व इतर ठिकाणी सामाजिक संदेश देण्यात आले आहेत.
श्री गणरायाचे आगमन त्याच समवेत गौरीचे स्वागत यानिमित्त वडूज नगरीत आकर्षक देखावे पाहण्यास मिळत आहे. कर्मवीर नगरमध्ये स्वत: प्राध्यापक असलेले हणमंतराव खुडे यांच्या शिव-शांती निवासस्थानी त्यांची पत्नी रंजना खुडे यांनी माँसाहेब जिजाऊ, शिक्षणमाता सावित्रीमाई फुले,पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आदर्श इतर महिलांनी घ्यावा असा सुंदर देखावा तयार केला आहे. त्यासाठी चैतन्य, धीरज,विरेंद्र या मुलांचे सहकार्य लाभले आहे.
रस्यावरील वाढत्या अपघाताने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. काही जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दररोज अपघाताची बातमी येत आहे. त्यामुळे सर्वांनीच वाहतूकीचे नियम पाळा. असे सांगणारी सुंदर गौरी बुलेटवर बसून सुरक्षित प्रवास करीत असल्याचा देखावा करण्यात आला आहे. महिला वर्गाला आत्मबळ देणाऱ्या देखाव्याने फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वसा सांभाळून ठेवला आहे. अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
याच कर्मवीर नगरीत शेतकरी कुटूंबातील वृतपत्र विक्रेते शामराव शिंदे त्यांची पत्नी लक्ष्मी शिंदे, कन्या रूपा रासकर, मुलगा सचिन शिंदे व नातू निलेश यांनी गौरी-गणपती सजावट व देखाव्याची परंपरा कायम जपली आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटाने सार्वजनिक उत्सवाला निर्बंध आले होते. ती कसर भरून काढण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांशी निगडित बैलगाडी शर्यतीवर बंदी आणली होती. अशा वेळी खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नाने सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली. त्या आनंदा निमित्त यंदाच्या वर्षी हूबेहुब बैलगाडी शर्यतीचा आकर्षक देखावा तयार केला आहे.
बैलगाडी शर्यत नोंदणी पासून ते बैलगाडी शर्यत अड्डा, चहा- पान स्टॉल, शर्यतीच्या बैलगाड्यांच्या गर्दी या देखाव्यात समावेश केली आहे. श्री कृष्णा जन्मापासून ते युद्धापर्यंत प्रसंग, खंडोबा म्हाळसा ,माण-खटावच्या भूमीतील दुष्काळ. सांगलीचा महापूर असे यापूर्वी देखावे केले आहेत.
यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात सण साजरा होत आहे. अनेक ठिकाणी चांगले देखावे व सामाजिक सलोखा पहाण्यासाठी दिवसरात्र गर्दी होत असून येणाऱ्या भाविकांच्या चहा पाण्याची व्यवस्था करून माणुसकी जपली जात आहे. भाजप नगरसेविका सौ.रेखा श्रीकांत बनसोडे यांनी तिरुपती बालाजी दर्शनासाठी बैलगाडीतून गौरी आल्याचा देखावा सादर केला आहे. बालाजी मंदिराची भव्यता येथे पाहण्यास मिळत आहे. तसेच सुभाष गुरव यांच्या घरातील देख्याव्यात राष्ट्रीय एकात्मता व ध्वजारोहण देखावा तसेच चांगली आरास पाहण्यास मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत देखावे पहाण्यासाठी गर्दी होत असून सर्वत्र समाधानाची वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, वरुण राजांच्या हजेरीने शेतकरी वर्ग सुखावले आहेत. मात्र, वडूज नगरीतील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाली असून रस्त्यावरून चालणे सुध्दा कठीण झाले आहे. त्यापेक्षा ग्रामपंचायत बरी अशी म्हणायची पाळी कर्मवीर नगर वासियांवर आली आहे. त्याचा जिवंत देखाव्याचा स्थानिक
रहिवाशी पावसात अनुभव घेत आहेत.