राहुलकुमार अवचट
यवत – यवत (ता. दौंड) येथील तृतीयपंथी वाड्यात गौरी-गणपती बसविण्याची ३३ वर्षाची परंपरा आहे. यावर्षीही तीच परंपरा राखून तृतीय पंथीयांनी वाड्यात पारंपारिक पद्धतीचा सुवासिनी भोजनाचा हलता देखावा तयार केला आहे.
यवतमधील तृतीयपंथी वाड्यात साजरा होणारा गौरी गणपती उत्सव विशेष प्रसिद्ध आहे.दीपा गुरू आणि रंजिता नायक यांनी गौरी गणपती समोर जुनी पितळी भांडी, सुवासिनी भोजन, चुल यासह पारंपरिक सजावट केली आहे. तृतीयपंथी वाड्यात गौरी गणपतीला केलेली सजावट पाहण्यासाठी केवळ गावातीलच नाही तर आजूबाजूच्या गावातील महिला व नागरिक भर पावसातही मोठ्या प्रमाणावर आले होते.
यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात हळदी- कुंकू घेण्यासाठी उपस्थित होत्या.दीपा गुरू, रंजिता नायक, पल्लवी गुरू दीपा, अचल गुरू दिव्या यांनी १ महिन्यापासुन तयारी केली आहे. असे सांगितले आहे.
दरम्यान, पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये येथील गौरी-गणपती लोकप्रिय झाला आहे. केवळ आकर्षक सजावट न करता मुलगी वाचवा मुलगी शिकवा, सर्व धर्म समभाव, वृक्षजोपासना, कोरोना योध्दा यासारखे सामाजिक संदेश देणारे देखावेही यापुर्वी साकारले आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक तृतीयपंथीयांचे गावातील सर्व नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने त्यांना नेहमी आदराची वागणूक गावात मिळत आहे.