पुणे : पुणे शहर पोलीस दलातील कर्त्यव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती विवेक देसाई यांचे रविवारी (ता.४) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. अत्यंत मनमिळाऊ, कर्त्यव्यदक्ष आणि निर्भीड अधिकारी स्वाती देसाई यांच्या निधनाने पुणे शहर पोलीस दलामध्ये शोककळा पसरली आहे.
स्वाती देसाई या जवळपास २५ हून अधिक वर्षे पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या. त्यांनी सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले. त्यानंतर पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत काही काळ काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती.
स्वाती देसाई यांनी सहकानगर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना, अनेक जटील गुन्ह्यांचा तपास लावला. प्रेयसीच्या दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्याला तातडीने पकडले होते.पीएमपी बसमध्ये चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांची टोळी पकडली होती.लहान मुलावरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा उघडकीस आणण्यात त्यांना यश आले होते. त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. सध्या त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या.
दरम्यान, पोलीस दलातील कर्त्यव्यदक्ष अधिकारी गमावल्यामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. स्वाती देसाई यांची अंत्ययात्रा बिबवेवाडी येथील निवासस्थानापासून आज सकाळी निघेल. आणि वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.