पुणे / राजेंद्रकुमार शेळके : सह्याद्री वाहिनीवरील ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाचा सुवर्ण महोत्सव पुणे येथील लाॅ कॉलेज रोड, दामले हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाला आज (दि.२) ५० वर्षे पूर्ण होत असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, पुणे दूरदर्शनचे संचालक संदीप सूद, एफटीआयआयचे माजी अध्यक्ष बी. पी. सिंग हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन निर्माते अशोक डुंबरे यांनी स्वागत केले.
‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी गेली ५० वर्ष सातत्याने शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावं म्हणून मार्गदर्शन करत आहे. यामुळे कार्यक्रमात केकऐवजी शेतकऱ्यांनी पिकवलेली आणि मातीत उगवलेलं फळ म्हणजे पपई कापून आगळावेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची निर्मिती करणाऱ्या सेवानिवृत्त झालेल्या कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिंग, लाइटिंग असिस्टंट एडिटर, ग्राफिक आर्टिस्ट, निवेदक इत्यादींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. जुन्या पिढीतील हे सर्व सहकारी वेगवेगळ्या शहरांतून, प्रांतातून हजर झाले होते. यातील काहींनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जुन्या जाणकारांनी अनुभव लिहून पाठवावेत
यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त असा आहे, आपला महाराष्ट्र कृषी क्षेत्रात, सहकार क्षेत्रात अग्रेसर आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमातून सरकारी योजनांची माहिती दिल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित झाला’. या कार्यक्रम निर्मितीत भाग घेणाऱ्या जुन्या जाणकारांनी आपले अनुभव लिहून पाठवावेत. त्याचे एक चांगले पुस्तक बनवता येईल, अशी संकल्पना मांडली. या पुस्तक प्रकाशनाचा खर्च स्वतः खासदार करणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा कार्यक्रम
उल्हास पवार यांनी दूरदर्शन किती महत्त्वाचं माध्यम आहे याची अनेक उदाहरणं सांगितली. ‘आमची माती आमची माणसं’ हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे, असे सांगितले.
ॲग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी ॲग्रोवन हे एकमेव भारताचे दैनिक आहे. शेती हा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे माध्यमाद्वारे त्यांना अधिक चांगली माहिती द्यावी असा सल्ला दिला. दूरदर्शनच्या संचालक संदीप सूद यांनी नवीन कार्यक्रमात ‘आमची माती आमची माणसं’ अधिक चांगला कसा होईल, हे पाहिलं जाईल, असा आशावाद व्यक्त केला.
दरम्यान, जुन्नर तालुक्यातील ओतूरचे सुपुत्र असलेले अशोक डुंबरे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य जुन्नरकर याप्रसंगी उपस्थित होते. स्तंभलेखक संजय नलावडे, कवी संजय गवांदे, शरदराव डुंबरे यांनी ‘आमची माती आमची माणसं’ फेम कार्यक्रम निर्माते अशोक डुंबरे आणि आताचे अशोक डुंबरे याबाबतचे अनेक मनोरंजक किस्से आपल्या मनोगतात सांगितले.