कैलास गायकवाड
लोणी (पुणे) : केंद्र सरकारच्या निर्देशानूसार पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ आक्टोबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून एक तास श्रमदान मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ आक्टोंबर रोजी देशभर श्रमदान मोहिम राबविण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानूसार पुणे जिल्ह्यात एक तास श्रमदान करण्याचे नियोजन तयार करण्यात आले होते. महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ही मोहीम राबवून महात्मा गांधीजींना हीच खरी श्रद्धांजली ठरणार आहे. जिल्ह्यात गावागावांत सार्वजनीक ठिकाणी, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र मंदिरे, बाजारतळ, बसस्थानक, नदी किनार या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता पंधरावडा आंबेगावच्या पूर्व भागात नियोजन करण्यात आले होते. प्रत्येक गावात श्रमदानाने एक तासभर साफसफाई करण्यात आली. पारगाव पोलीस स्टेशन, लोणी, धामणी, खडकवाडी, वडगाव पीर, शिरदाळे या गावांनी गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील प्रमुख कार्यकर्ते यांनी श्रमदानामध्ये भाग घेतला.
दरम्यान, पारगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी, पारगावातील प्रमुख कार्यकर्ते, महिला दक्षता समितीतील महिला यांनी श्रमदानाने एक तास गावात साफसफाई केली. लोणी ग्रामपंचायत हद्दीत माजी सरपंच उद्धवराव लंके, चंद्रकांत गायकवाड, विकास सेवा संस्थेचे माजी चेअरमन सतीश थोरात, पोलीस पाटील संदीप आढाव, ग्रामसेवक अनिल टेमकर यांनी सहभाग घेतला.