विशाल कदम
पुणे– “मिशन बारामती” मोहीमेतंर्गत आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार कोणत्याही परीस्थितीत ताब्यात घ्यायचाच या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने आत्तापासुन तयारी चालवली आहे. या मोहीमेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन गणेशोत्सवानंतर बारामती लोकसभा मतदार संघात येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पुर्व तयारीसाठी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी (ता. ६) रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीचा म्हणजेच माजी केंद्रियमंत्री शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. शऱद पवार देतील तोच उमेदवार, तोच खासदार हे बारामती लोकसभा मतदार संघाचे आजवरचे समिकरण निश्चीत मानले जात असले तरी, आगामी निवडणूकीत हा मतदार संघ जिंकाचाच या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने तयारी चालवली आहे.
लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (भाजप पुरस्कृत) आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या थेट लढत झाली होती. यात सुप्रिया सुळे यांनी महादेव जाणकर याचा अवघ्या ६९ हजार मतांनी पराभाव केला होता. माजी केंद्रियमंत्री शरद पवार यांचा या मतदार संघावरचा प्रभाव पहाता,ही निवडणुक अटीतटीची झाली होती. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांना मतांचा फार मोठा हात दिल्यानेच, सुळे दिल्लीत जाऊ शकल्या होत्या.
तर दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी, कांचन कुल यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना २०१९ ला चांगलीच लढत दिली होती. त्यावेळी पराभूत कुल यांना ५ लाख ३० हजार मते मिळाली, तर सुळे यांना ६ लाख ८४ हजार मते मिळाली. त्या लढतीत सुळे यांनी १ लाख ५३ हजार मते मिळवत विजयी खेचला होता. मात्र आगामी निवडणुकीत कोणत्याही प्रकारची रिस्क नको या उद्देशाने भाजपाने दोन वर्षे अगोदरच बारामती लोकसभेची तयारी सुरु केली आहे.
या तयारीचा एक भाग म्हणुन भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामतीत दिवसभर असणार आहेत. यावेळी दौंडचे विद्यमान आमदार व जिल्ह्यातील पक्षाचे स्टार प्रचारक राहुल कुल, खडकवासलाचे आमदार भिमराव तापकीर, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, इंदापुरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत. देशभरात भारतीय जनता पक्षाचा आक्रमक प्रचार पहाता, बारामती लोकसभेची पुढील निवडणुक नक्कीच लक्षवेधी ठरणार हे नक्की.