पुणे : ‘आम्ही सिध्दलेखिका‘ ठाणे जिल्हा आणि पाणिनी फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिंडी चालली पंढरी’ हा कार्यक्रम आषाढी एकादशी आणि आगामी गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि प्रमुख पाहुणे म्हणून लेखिका, समीक्षक, मार्गदर्शक डॉ. प्रतिभा कणेकर होत्या. या प्रसंगी डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या महर्षी व्यास या दीर्घ कादंबरीची संकल्पना स्पष्ट केली. महर्षी व्यासांनी वेदवाङ्मयाचा अनमोल ठेवा संग्रहित केला. महान ॠषीमुनींच्या ज्ञानाचा अनमोल ठेवा आपण वाचला पाहिजे आणि वाचवला पाहिजे अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली.
डॉ. प्रतिभा कणेकर यांनी गुरूंनी दिलेले ज्ञान प्राप्त करण्यास शिष्य तेवढ्याच क्षमतेचे असावे लागतात. तरच गुरूज्ञान आत्मसात करता येते आणि टिकवले जाते, हे अनेक उदारहणातून स्पष्ट केले. या कार्यक्रमाची सुरुवात संस्था अध्यक्ष, विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी यांच्यासह साहित्य दिंडीने झाली.
दरम्यान कार्यक्रमात अभंग लेखिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली. आशा दोंदे यांनी अभंग रचनेवर प्रत्यक्षदर्शी सुंदर चित्रं काढली. पारितोषिक घोषणा मानसी जोशी यांनी केली. पाणिनीच्या संचालिका संगीता चव्हाण यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. प्रेमदादा झंवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘दिंडी चालली पंढरी’ हा प्रा.पद्मा हुशिंग यांची संकल्पना असलेल्या संतकाव्य गायनाच्या कार्यक्रमात गायिका संपदा दळवी, सरिता आठवले यांनी उत्कृष्ट अभंग सादर करून रसिकांची वाहवा मिळवली, तर संतपरंपरेची माहिती आपल्या निवेदनात प्रा. विजया पंडितराव आणि संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांनी दिली.
जेष्ठ साहित्यिक विजया पंडितराव यांची एका वर्षात सहा पुस्तके प्रकाशित झाल्याने त्यांचा खास सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेच्या विश्वस्त, सल्लागार मा. आशाताई कुलकर्णी, भारती मेहता, वासंती वर्तक, सचिव वृषाली राजे, दिपा पटवर्धन तसेच अन्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हा शाखेच्या पदाधिकारी मानसी जोशी,संगीता चव्हाण, अस्मिता चौधरी,प्रतिभा चांदुरकर अलका दूर्गे किरण बरडे तसेच इतर समिती सदस्यांनी कार्यक्रम नियोजनाची जबाबदारी पार पाडली.