केडगाव / संदीप टूले : दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी, काळेवाडी गावचे भूषण पशूवैद्यकीय, क्रिकेटप्रेमी, डॉ. स्व. राहुल रावसाहेब भोसले यांचे दहावे पुण्यस्मरण होते. या स्मरणार्थ हिंगणीबेर्डी, काळेवाडीकरांनी भव्यदिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा भरवली होती.
या स्पर्धेचे नियोजन गणेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजक विकास वाळके, निखिल वनारसे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठान हिंगणीबेर्डी यांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटन सर्व ग्रामस्थ हिंगणी बेर्डी, काळेवाडी आणि सर्व संघ मालक यांच्या हस्ते पार पडले.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस डॉ. संदीप गायकवाड यांनी ११,१११ तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस विष्णू माने यांनी ७,७७७ तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस तुकाराम गायकवाड ५,५५५ यांनी दिले. या स्पर्धेसाठी राम दिलीप यादव, गणेश, कल्याण माने, हनुमंत कामठे यांनी सहकार्य केले. तर या स्पर्धेमध्ये बागल वॉरियर्स, आर्यन ११, सुभद्रा डेंटल ११, उपसरपंच ११, परी स्टायकर्स, चॅम्पियन ११, विठ्ठल नगर स्पोर्ट ग्रूप, महाकल ११, दोस्ती ११ अशा एकूण ९ संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे संघामधील खेळाडूंची निवड पूर्णपणे बोलीद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे या स्पर्धेचे सामने अतिशय चुरशीचे पाहायला मिळाले.
खेडेगावातील तरुण खेळाडूंनी दूरदर्शनवर पाहिलेली बोली पद्धत प्रत्यक्षात अनुभवली. या स्पर्धेच्या अत्यंत रोमहर्षक अंतिम सामन्यात स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी बागल वॉरियर्स ठरला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी परी स्टायकर्स आणि तृतीय क्रमांक चॅम्पियन ११ हे संघ विजेते ठरले.
क्रिकेटचे सामने भरवून गावकऱ्यांनी जपली सामजिक बांधिलकी
हे क्रिकेटचे सामने भरवण्यामागे एक भावनिक कारण होते. कारण पशुवैद्यकीय डॉ. स्व. राहुल भोसले यांनी हिंगणी बर्डी परिसरातील असंख्य जनावरांचे प्राण वाचवले होते. तेही विनामूल्य शेतकऱ्यांकडे पैसे असो नसो ते आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडणारे व्यक्तिमत्त्व डॉक्टरांचे होते. तसेच डॉक्टर हे क्रिकेटप्रेमी होते. त्यांना क्रिकेट खूप आवडायचे ते मुलांच्यात वेळ काढून क्रिकेट खेळायचे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी डॉक्टरांची आठवण म्हणून त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ क्रिकेटचे आयोजन केले होते.