युनूस तांबोळी
शिरूर (पुणे) : पिंपरखेड (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. ०२) पहाटे एका तरुण शेतामजुरावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुक्तीच उघडकीस आली आहे.
संजय दुधावडे असे बिबट्याने हल्ला केलेल्या तरुण शेतमजुराचे नाव आहे. या घटनेत संजयच्या पायाला बिबट्याने चावा घेतल्याने दुखापत झाली आहे. सदरच्या घटनेने बेट भागातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांमधून केली जात आहे.
पिंपरखेड-जांबूत रस्त्याच्या बाजूला अरुण बाळू ढोमे यांच्या शेतातील शेतमजूर संजय नाना दुधवडे (रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर) हा पहाटे ३.३० वाजता लघुशंका करुन घरात जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने मागुन हल्ला केला. प्रसंगावधान राखत तरुण पटकन झोपडीत शिरल्याने थोडक्यात बचावला. यावेळी बिबट्या डरकाळ्या फोडत तासभर झोपडीच्या कडेने घिरट्या घेत होता. बिबट्या झोपडीत शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन झोपडीतील तरुणांनी जीव मुठीत धरून पेट्रोलवरील फवारणीचा पंप सुरू करुन आवाजाने बिबट्याला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात तरुणाच्या पायाला बिबट्याने चावा घेतला असून चांगलीच दुखापत केली आहे.
सकाळी या घटनेची माहिती नरेश ढोमे यांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपाल, वनरक्षक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पहाणी करून पंचनामा केला. जखमी तरुणाला प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी हाजी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिरूर तालुक्यात बेटभागात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरीकांचे अस्तित्व धोक्यात आले असून जांबुत, पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची नागरीकांकडून मागणी होत आहे.
दरम्यान, बिबट्या हा घाबरट प्राणी असून त्याला पाहिल्यावर त्याला डिवचू नये. वस्तीवर राञी घरातून बाहेर पडताना काळजी घ्या. शेतावर समूहाने जा. शेतात काम करत असताना सावधानता बाळगा. असे वनविभागाने सूचीत केले आहे.