Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : दारु पिऊन मारहाण करणा-या पतीला भिती दाखवण्यासाठी अंगावर थोडेसेच पेट्रोल ओतून घेऊन मरण्याची धमकी देणा-या पत्नीला पतीने काडी ओढून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. वळती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. १२) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
दोघांवर गुन्हा दाखल
अमृता अक्षय कुंजीर (वय २३, रा. वळती, ता. हवेली) असे पेटवून दिलेल्या महिलेचे नाव आहे. तर अमृता कुंजीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती अक्षय मारुती कुंजीर व सासू आशा मारुती कुंजीर (रा. दोघेही वळती, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता कुंजीर व अक्षय कुंजीर यांचा २०२० प्रेमविवाह झाला आहे. अक्षय याला दारू पिण्याचे व्यसन आहे. मंगळवारी (ता. १२) दुपारी असाच तो दारू पिऊन आला व पत्नी अमृता हिच्याशी वाद घालून सामानाची तोडफोड करू लागला. त्यावेळी त्याने अमृताला तु घरातून निघून जा, तु घरात रहायचे नाही, असे म्हणाला.
यावेळी अमृता म्हणाली कि मी मरुन जाते. येळी शेतीपंपासाठी आणलेल्या पेट्रोलमधील थोडे पेट्रोल त्याला भिती दाखविण्यासाठी अंगावर ओतले. त्यावेळी त्याने काडे पेटी आणून अंगावर टाकली. त्यानंतर त्यानेच फिर्यादीच्या अंगावर पाणी ओतून विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत फिर्यादी यांची छाती, गळा व तोंडास गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, सासु आशा कुंजीर यांनी तू जर सांगितले की तुला तुझ्या नवर्याने पेटविले तर दवाखान्यात उपचार करणार नाहीत, अशी भिती दाखविली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लोणी काळभोर पोलिसांना चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतल्याने भडका होऊन भाजले असे भितीपोटी सांगितले होते. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करीत आहेत.