पुणे : फिल्म टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (एफटीआयआय) एका २५ वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी (ता. ०२) दुपारी एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह इन्स्टिट्यूटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कामाक्षी बोहरा (वय-२५, रा. नैनीताल, उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. डेक्कन पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाक्षी ही २०१९ पासून संस्थेच्याच हॉस्टेलमध्येच ती राहत होती. ती ‘पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अॅक्टींग’मध्ये शिक्षण घेत होती. गुरुवारी कामाक्षी वर्गात न आल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थिनींना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या जवळच्या मित्र मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात आली असून त्यासंबंधात काही गोष्टींचा उलघडा होता का त्याचाही तपास पोलिसांकडून चालू आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी महिन्याभरातील ही दुसरी घटना आहे. मागील महीन्यात म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी येथील वसतीगृहात एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. महिनाभरात ही दुसरी आत्महत्या झाली असल्याने एफटीआयमध्ये खळबळ उडाली आहे.