राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत: यवत परिसरात घरोघरी बाप्पाचे आगमन भक्तिमय वातावरणात आनंदात झाले असून, सर्वत्र उत्साहात गणरायांचे स्वागत करण्यात आले. बुद्धीची देवता श्री गणेश, विघ्नहर्ता विघ्नेश्वर, मंगलमूर्ती मोरया, ओंकारस्वरूप गणनायक, बालकांचा गणपती बाप्पा अर्थातच, गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा अशा लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मंगलमय सोहळ्याचा प्रारंभ भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अर्थात आजपासून होत आहे. हा सोहळा अनेक ठिकाणी तब्बल १० दिवस चालणार असून उत्तरोउत्तर तो रंगत जाणार आहे.
सर्वत्र उत्साहात स्वागत
यवत परिसरात आज सकाळपासूनच घरोघरी बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. घरोघरी व लहान मोठ्या मंडळांमध्ये धुमधडाक्यात बाप्पांचं स्वागत करण्यात येत आहे. (Yavat News) ढोल-ताशे, गुलाल, फुलांच्या उधळणीमध्ये बाप्पा घरोघरी आणले जात आहे. सार्वजनिक मंडळांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आज सकाळपासूनच अनेक बालगोपाळांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी पालकांबरोबर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
गणपती बाप्पाला घरी नेताना अनेक लहान मुलांच्या तोंडातून ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याचा आवाज घुमत होता. तर तरुण मंडळातील कार्यकर्ते ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोष करत आपल्या गणरायाला घेऊन जात असल्याचे दिसून आले. (Yavat News) घरोघरी पारंपारिक पद्धतीने तर काही ठिकाणी धार्मिक पद्धतीने गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या घरी गणपतीचे आगमन होत असल्याने अनेक घरांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.
यवत गावातील सर्वात जुने मंडळ अशी ओळख असणाऱ्या नूतन तरुण मंडळ, तसेच यवतमधील प्रमुख मंडळ असलेले श्रीनाथ मित्र मंडळ, नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या अमर तरुण मंडळ, अखिल व्यापारी मित्र मंडळ, साई गणेश मित्र मंडळ, अखिल कदमवाडी मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ, यांसह प्रमुख मंडळांची प्रतिष्ठापना रात्री उशिरा करण्यात येते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : सुजित खेडेकर यांना तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
Yavat News : मिरवडी येथे शिक्षकांचा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान