लोणी काळभोर, (पुणे) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला रिंगरोड प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. रिंगरोडसाठीची अधिसूचना महसूल व वन विभागाचे उपसचिव सचिन कोठेकर यांनी काढली आहे. तर दुसरीकडे कदमवाकवस्ती हद्दीतील रिव्हर व्ह्यू सिटीजवळून जाणाऱ्या दुसऱ्या रिंगरोड मार्गी लावण्याच्या दृष्टीने सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. यामुळे पूर्व हवेलीत कवडीपाट टोलनाका ते कोरेगाव मूळ या दरम्यान दोन रिंगरोड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रिंगरोड कोणत्या गावांतून, कोणत्या सर्व्हे नंबरमधून जाणार, तसेच त्या सर्व्हे नंबरमधील किती क्षेत्र संपादित करावे लागणार, याबाबतची माहिती अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. रिंगरोडचा हा प्रवास खेड, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्यांतील ४४ गावांमधून होणार आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाची कार्यवाही ‘एमएसआरडीसी’कडून सुरू करण्यात आली आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रस्ताव कागदावरच होता. आता तो मार्गी लावण्याच्या दृष्टीने सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
दोन्ही रिंगरोडमधील अंतर १५ ते २० किलोमीटर असणार आहे. रिंगरोड प्रकल्प उभारण्यापूर्वी हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास त्याचा सामाजिक परिणाम काय होऊ शकतो, याचा अभ्यास करून अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, राज्य सरकारने ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडसाठी ‘सामाजिक परिणाम निर्धारणा’बाबतच्या तरतुदींना कलम १० क अन्वये सूट दिली आहे. ४४ गावांमधील सुमारे एक हजार ३०१ सर्व्हे नंबरमधून हा रिंगरोड जाणार असून, यासाठी सुमारे साडेसातशे हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.
प्रत्यक्ष कामाला लवकरच होणार सुरुवात..
भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण १९०० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार असून, २६ हजार ८०० कोटी रुपयांचा खर्च प्रकल्पासाठी अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शहराभोवती १७२ किलोमीटर रिंगरोड केला जाणार आहे. त्यासाठी आता अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.
‘या’ गावांमधून जाणार ‘एमएसआरडीसी’चा रिंगरोड
खेड : सोलू
हवेली : निरगुडी, वडगाव शिंदे, लोहगाव, वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, कदमवाकवस्ती, फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, नऱ्हे, धायरी, वडगाव खुर्द, नांदेड, शिवणे, वारजे
–
मुळशी : बावधन खुर्द, भूगाव, बावधन बुद्रुक, सूस, नांदे, माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे
–
मावळ : सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोदुंब्रे, धामणे, परंदवडी
‘पीएमआरडीए’चा रिंगरोड ‘या’ गावांमधून जाणार
हवेली : तुळापुर, भावडी, लोणी कंद,पेरणे, बकोरी, डोंगरगाव, वाडे बोल्हाई, गावडेवाडी, मुरकुटे नगर, बिवरी, पेठ, कोरेगाव मूळ, शिंदवणे, वळती, तरडे, आळंदी म्हातोबाची.
पुरंदर : सोनोरी, काळेवाडी, दिवे, हिवरे, चांबळी, कोडीत खुर्द, गराडे,
भोर : कांबरे खे.बा., नायगाव, केळवडे,
मावळ : परंदवाडी, उर्से, तळेगाव, वडगाव, कातवी, आंबी, आकुर्डी, नाणोली तर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे.
खेड : खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोलेगाव