धनंजय साळवे
कवठे येमाई, (पुणे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील न्यू इंग्लिश जुनियर कॉलेज ऑफ आर्ट येथे शालेय विद्यार्थ्यांना कार्यानुभव या विषयांतर्गत येणाऱ्या चित्रकला, मातीकाम, शिल्पकला या उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक अशा शाडूच्या माती पासून श्रीगणेश मूर्ती बनवण्याची कला शिकवण्यात आली.
विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक मच्छिंद्र करंजकर यांनी शाडूच्या मातीपासून गणपती बनवण्याचे प्रशिक्षण पुणे येथे घेतले आहे. या कलेचा विद्यार्थ्यांनाही उपयोग व्हावा म्हणून त्यांनी नुकतेच त्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले आहे. विद्यार्थी सुद्धा मोठ्या तळमळीने व आत्मीयतेने ही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे.
महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त अनेक स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचा समावेश असतो. याच बरोबरीने गेल्या वर्षीपासून त्यांनी मुलांना शाडूच्या मातीपासून श्री गणेश मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव भेटून त्यांच्यातील सुप्त गुणांना चालना भेटण्याचा त्यांचा उद्देश आहे.
दरम्यान, अशा नवीन उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. मुलांनी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींना कार्यानुभव विषयांतर्गत विशेष श्रेणी दिली जाणार आहे.