पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. गुरुवारी (ता. १४) रात्री उशिरा ही घटना घडली.
याबाबत अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काटे मळा चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी येथे एका कंपनीला आग लागल्याची वर्दी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला मिळाली. आग मोठ्या स्वरुपात असल्याने प्राधिकरण, पिंपरी, रहाटणी, थेरगाव, चिखली, भोसरी, तळवडे, बजाज ऑटो आकुर्डी, एमआयडीसी हिंजवडी फेज एक, पीएमआरडीए मारुंजी, टाटा मोटर्स इत्यादी ठिकाणावरून अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सुमारे ६५ जवानांनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान, जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊनमधील मटेरियल बाजूला करून, कुलिंग करत आग पूर्णपणे विझवण्यात आली. या आगीत गोडाऊनमधील ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट, लोखंडी मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, रबर, लाकडी रॅक, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, इलेक्ट्रिक वायर, बोर्ड, पत्रे आदि साहित्य जळून सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.