कवठे येमाई / धनंजय साळवे : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जैन धर्मातील भाद्रपद महिन्यातील पवित्र अशा पर्युषण पर्वाला मंगळवार (दि.१२) रोजी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी भौम प्रदोष व्रत जैन बांधवांकडून ठेवण्यात आले होते. कवठे येथील जैनमंदिर व आराधना भवनातील नित्य नियमाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर जैन बांधवांनी पाबळ येथील मंदिरात दर्शन व प्रवचनाचा लाभ घेतला.
पाबळ येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री पद्ममणी जैन मंदिर येथे विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. जैन धर्मात इतर सर्व सणांपेक्षा पर्युषण पर्व अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये जैन धर्मिय लोक दहा दिवस निरंकार उपवास करत असतात. याचबरोबर आपले आराध्य दैवत महावीर स्वामींची मनोभावे पूजा करतात. भगवान महावीरांच्या आयुष्याच्या प्रभावाने पर्युषण उत्सव साजरा होत असतो. ज्या काळात भगवान महावीरांनी आपल्या अनुयायांना शिकवण दिली त्याला पर्युषण पर्व म्हटले जाते. सत्याच्या मार्गावर भगवान महावीरांनी या पर्वामध्ये चालायला शिकविले.
पर्युषण पर्वात पाच कर्तव्यांची विशेष काळजी घेतली जाते. त्यामध्ये तीर्थंकर यांची पूजा आणि स्मरण व दुसरे म्हणजे स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समर्पित करणे हे व्रत केल्याने वाईट कर्म नष्ट होतात. मोक्षाचा मार्ग सोपा होतो. संवत्सरी, केश लोचन, प्रतिक्रमण, तपश्चर्या, टीका आणि माफी ही पाच कर्तव्य या पर्वात महत्त्वाची समजली जातात.
कवठे येथील जैन मंदिर खूप प्राचीन आहे. या मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक राज्यभरातून येत असतात. या मंदिरात पर्युषण पर्वात रोज सकाळी साडेसहा वाजता भक्ताम्बर स्त्रोत्र पठण, सकाळी आठ वाजता स्नात्र पुजा, सकाळी दहा ते साडे अकरापर्यंत आचार्य विश्वकल्याण सुरीश्र्वजी मा. सा. यांचे व्याख्यान, संध्याकाळी सहा वाजता प्रतिक्रमण, रात्री आठ वाजता भक्ती भावना असे कार्यक्रम रोज दहा दिवस आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री जैन शेतांबर संघ कवठे अध्यक्ष रितेश शहा व उपाध्यक्ष ललित कोचर यांनी दिली.