Health News : भाज्या आपल्या शरीरासाठी पोषकतत्त्वांचा उत्तम स्रोत आहेत. हिरव्या भाज्या खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करणे असो, वाढवणे असो वा हेल्दी राहणे असो; या प्रत्येक स्थितीमध्ये लोक त्यांच्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या समाविष्ट करतात. फ्लॉवर खाण्याचे काही विशेष फायदे आहेत.
फ्लॉवर ही फक्त पौष्टिक भाजी नसून, पोषणाचे पॉवरहाऊस आहे. फ्लॉवरमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी असते आणि अँटी-ऑक्सिडेंट व इतर पौष्टिक घटकांचे प्रमाण जास्त असते. फ्लॉवर पावसाळ्यात खाणे शक्य असले तरी त्याची निवड आणि साफसफाई करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात ओलसर स्थितीमुळे भाजीपाल्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. फ्लॉवर खाण्याआधी तो स्वच्छ आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी फ्लॉवरला कोमट मिठाच्या पाण्यात धुऊन घेणे महत्त्वाचे आहे, असे आरोग्यतज्ज्ञांकडून सांगितले जाते.
फ्लॉवर अँटिऑक्सिडंट्स विशेषतः व्हिटॅमिन सी आणि मँगनीजने समृद्ध असतो. फ्लॉवरमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील तणाव कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. फ्लॉवर हे आहारातील फायबर पचनास मदत करते आणि आतडे निरोगी ठेवते. फ्लॉवरमध्ये ग्लुकोसिनोलेट्ससारखी संयुगेही असतात जी यकृत साफ ठेवण्यास मदत करतात. फ्लॉवरमधील व्हिटॅमिन के हाडांना मजबूत करण्याचे काम करते. फ्लॉवरमध्ये शक्तिशाली आणि मजबूत अँटीऑक्सिडंट्स असतात; जे पेशींचे कार्य मजबूत करतात.