पुणे : एक तरूण भल्यामोठ्या झाडावर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जाऊन बसल्याचे समोर आले. त्याचं कारण होतं आई आणि प्रेयसी. त्यामुळेच हा तरूण वाडिया महाविद्यालयाजवळील एक झाडावर जाऊन बसला होता. तो खाली उतरावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते. मात्र, ते काय साध्य होईना. अखेर क्रेनच्या मदतीने या तरूणाला खाली आणण्यात यश आले.
उस्मान सैय्यद असे या तरूणाचे नाव आहे. उस्मानची आई आणि त्याच्या प्रेयसीचे काही कारणास्तव वाद होते. या वादातून हा तरूण चांगलाच तणावात होता. त्यामुळे तो आत्महत्या करण्याच्या तयारीत वाडिया महाविद्यालयाजवळील एक बड्या झाडावर जाऊन बसला होता. याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी समजूत घातली. मात्र, तरीही तो खाली उतरत नव्हता. सर्वांनाच्या त्याच्या जीवाचे काही बरे वाईट होईल अशी भीती वाटत होती. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.
शिवसेना विभागप्रमुख (कॅन्टोमेंट) आणि उन्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांनी या तरूणाला खाली आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जेव्हा अग्निशमन दलाची शिडी तोकडी पडत होती. तेव्हा त्यांनी मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी असलेली एक मोठी क्रेन घेऊन तरुणाकडे धाव घेतली. तब्बल तासभर समुपदेशन करुन त्याला क्रेनच्या बकेटमध्ये बसवून खाली आणले.
आत्महत्येचे कारण विचारताच…
जेव्हा हा तरूण झाडावर गेल्याचे दिसले. तेव्हा त्याला आत्महत्या का करतोय हे विचारले असता प्रेयसी आणि आईतील वादामुळे आत्महत्या करतोय असे तो बोलला. त्याला बोलते ठेवत त्याच्या आईचा नंबर घेऊन व्हिडिओ कॉल केला. मात्र, आईचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. त्याच्या आईने त्याच्या प्रेयसीचा नंबर तिने दिला. पण तरीही तो खाली येण्यास तयार नव्हता. अखेर सिगारेटच्या बहाण्याने त्याचा हात धरला आणि त्याला खाली आणले गेले.