संदीप टूले
केडगाव, (पुणे) : दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक असून, कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसह दौंड तालुक्यातही दोन गट पडले असून, पूर्वीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार हे शरद पवार गटासोबत असल्यामुळे अजित पवार गटाकडून तालुकाध्यक्ष निवडला जाण्याच्या हालचाली चालू असून, माजी आमदार रमेश थोरात हे कोणाला संधी देतात की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वरूनच नाव सुचवतील याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
इच्छुकांमध्ये दिलीप हंडाळ, नितीन दोरगे, उत्तम आटोळे, संभाजी ताकवणे यांची नावे अधिकच चर्चेत असून, तालुकाध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदारमध्ये केडगावचे दिलीप हंडाळ हे माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असून, त्यांचा तरुण वर्गामध्ये दांडगा जनसंपर्क आहे. धनगर समाजाचा एक आश्वासक तरुण चेहरा म्हणून ते पुढे येत आहे.
दौंड तालुक्यातील धनगर समाजाचे मतदान हे किती निर्णयात आहे हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण तालुक्याने पाहिले असून, दिलीप हंडाळ हे तालुकाध्यक्ष झाले तर धनगर समाजाचे निर्णायक मतदान नक्कीच येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या (अजित पवार गट) मागे उभे राहू शकते. तसेच येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकीमध्ये याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
भांडगावचे नितीन दोरगे हे पंचायत समितीचे माजी उपसभापती असून, त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षसंघटनेत उत्कृष्ट काम केले आहे. तालुक्यातील बहुतांश गटामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या शाखा स्थापन केल्या असून, यांचा पक्ष संघटनेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो व तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळ घालण्यात त्यांना चांगलीच हातोटी आहे.
संभाजी ताकवणे हे रमेश थोरात यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तालुकाभर प्रसिद्ध आहे. त्यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले असून, पारगावचे उप सरपंच, कृषी बाजार समितीचे संचालक तसेच पारगाव कार्यकारी सोसायटीत अपक्ष संचालक म्हणून निवडून येऊन एक वेगळाच ठसा राजकारणात उमठवला आहे. त्यांचे पारगाव परिसरासह इतर गावातील तरुण वर्गाचे चांगले संघटन कौशल्य पाहायला मिळते.
दरम्यान, उत्तम आटोळे (रावणगाव) यांनी देखील पंचायत समितीचे माजी उपसभापती म्हणून काम पाहिले असून, दौंडच्या पूर्व पट्ट्यामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तसे पाहिले तर पूर्व पट्ट्याला तालुकाध्यक्ष पद मिळाले तर येथील पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी मिळाल्यासारखे होईल. याचा फायदा राष्ट्रवादीला आगामी काळात नक्कीच होईल, असे जाणकार सांगतात.