पुणे : दुचाकीला धक्का देऊन, गाडीची चावी काढून घतली. तसेच फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने १,१०० रुपये काढून घेत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी दुचाकीसह पसार झाल्याची धक्कादायक घटना हडपसर रामटेकडी येथील वंदे मातरम चौकात घडली.
याप्रकरणी वानवडी परिसरातील शुभम उर्फ चम्या संजय कांबळे याच्यासह इतर तीन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत ५७ संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी घडला होता. या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख आरोपी शुभम उर्फ चम्या संजय कांबळे (वय-१९, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), टोळी सदस्य टिल्ली उर्फ इरफान गुलाम मोहम्मद शेख (वय-१९ रा. रामटेकडी, हडपसर), मंगेश रवि जाधव (वय-२०, रा. रामटेकडी, हडपसर), फिटर प्रेम्या उर्फ प्रेम अनिल थोरात (वय-१९, रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
या टोळीने गेल्या दहा वर्षांत संघटितपणे व वैयक्तिकपणे खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, लुटमार करणे, लोकांना दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे करीत आहेत.
दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार यासारख्या कारवाया केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे सांगितले.