युनुस तांबोळी
कवठे येमाई, (पुणे) : संकल्पतरू फाउंडेशन व ग्रामपंचायत कवठे येमाई यांच्या संयुक्त विद्यमाने मोकळ्या गायरान जमिनीवर 50 हजार वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच वृक्षारोपण करून करण्यात आला.
माजी पंचायत समिती सदस्य शिरूर डॉ. सुभाषराव पोकळे व ग्रामपंचायत कवठे येमाई यांच्या पाठपुराव्यामुळे संकल्पतरू फाऊंडेशनकडून कवठे येमाई गावातील गायरान जमिनीवर ५० हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करुन त्यांचे सहा वर्षे संगोपन करण्यात येणार आहे.
यात आंबा, नारळ, चिंच, जांभूळ असे विविध प्रकारचे झाडे लावण्यात येणार आहे. सहा वर्षानंतर यातून मिळणारे उत्पन्न हे ग्रामपंचायतीला मिळणार आहे. या मिळणाऱ्या उत्पन्नातून गावच्या विकासाला चालना मिळणार आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शिरूर डॉ. सुभाषराव पोकळे, माजी सरपंच बबनराव पोकळे, उपसरपंच उत्तम जाधव, माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, निखिल घोडे, उद्योजक आबा वागदरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सागर रोहिले, सामाजिक कार्यकर्ते किसन हिलाळ, दत्ता मुंजाळ, बाळशिराम मुंजाळ, विठ्ठल घोडे, अतुल हिलाळ, अविनाश पोकळे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर भाऊसाहेब पोकळे, कल्पतरू फाऊंडेशनचे अधिकारी सागर लडकत, गोपाल व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
उत्पन्नातून गावचा विकास साधला जाणार..
याबाबत बोलताना माजी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे म्हणाले, “कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व प्रत्येकाला कळाले आहे. प्रत्येक गावात ऑक्सिजन पार्क हा तयार झाला पाहिजे. त्यामुळेच हा महत्त्वपूर्ण पथदर्शी प्रकल्प या परिसरात प्रथमच होत आहे. शिवाय यामध्ये विविध प्रकारचे फळझाडे असल्याने त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावचा विकास साधला जाणार आहे.”