Pune News : पुणे : पुण्यात गणेशोत्सव काळात उभारण्यात येणारे देखावे पाहण्यासाठी राज्यभरातीलच नव्हे, तर विदेशातून देखील नागरिक येतात. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान, गणेश भक्तांची देखावे पाहण्यासाठी गर्दी होते. अनेकांना हे देखावे गर्दीमुळे किंवा माहिती नसल्यामुळे पाहता येत नाहीत. यामुळे यंदा प्रथमच महाराष्ट्र पर्यटन मंडळाने गणेश भक्तांसाठी एक अनोखी भेट दिली आहे. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या उत्सवासाठी पर्यटन मंडळाने टूर पॅकेज आयोजित केले आहे.
गणेश भक्तांसाठी एक अनोखी भेट
या पॅकेजमध्ये पुणे आणि मुंबईतील गणेश मंडळांचे देखावे दाखवण्यात येणार आहेत. एकूण १२ मंडळांमध्ये भाविकांना घेऊन जाण्यात येणार आहे. त्यात पुणे शहरातील सहा तर मुंबईमधील सहा मंडळे आहेत. मुंबईमधील फोर्टमधील इच्छापूर्ती गणेश मंडळ, केशवजी नाईक चाळ, चिंचपोकळी चिंतामणी, लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि जीएसबी वडाला येथील गणपतीचे देखावे या पॅकेजमध्ये पाहण्यास मिळणार आहे. तर पुणे शहरातील सहा गणेश मंडळे असतील. त्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग गणपती, गुरुजी तालीम, दगडूशेठ हलवाई गणपती आणि भाऊसाहेब रंगारी गणपतीचा समावेश आहे.
या पॅकेजची किंमत ३०० रुपये आहे. गणेश उत्सवाच्या या पॅकेजमध्ये रोज दोन बॅचेस असतील. त्यात २० जणांना संधी मिळणार आहे. पॅकेजचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांना एसी बस प्रवास आणि मंडळाच्या मांडवात व्हिआयपी एन्ट्री मिळणार आहे. हे बुकींग ‘बुक माय शो’वरुन करता येणार आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक या सर्व प्रकारचे देखावे भाविकांना पाहता येणार आहेत.