Pune News : जालना : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट लागले आहे. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील हे मागील नऊ दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. या घटनेनंतर जरांगे यांच्या पत्नीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बारा वाजेपर्यंत निर्णय घ्यावा, तरच ते उपोषण सोडायला तयार होतील, अशी विनंती त्यांनी केली आहे.
२२ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढत
गेल्या नऊ दिवसांपासून मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. घशात इन्फेक्शन आणि शरीरात ताकद राहिली नसल्याने जरांगे यांनी नीट बोलताही येत नाही. जरांगे यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने उपोषणस्थळी हजर झाले. त्यांनी जरांगे यांना सलाईन लावत त्यांच्यावर प्राथामिक उपचार केले. दरम्यान, तुम्हाला त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटतेय का? असं विचारलं असता जरांगे पाटलांच्या पत्नी म्हणाल्या की, मलाही त्यांची काळजी वाटत आहे. सरकारनेही त्यांची काळजी घ्यावी. आज बारा वाजेपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा. काल त्यांनी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. परंतु त्यांनी आणखी वेळ वाढवून मागितला. पण आज बारा वाजेपर्यंत सरकारने काय असेल तो निर्णय द्यावा, तरच ते उपोषण सोडायला तयार होतील.
या वेळी जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. सरकारने माझा जीवच घ्यायचे ठरवले आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. दोन वर्षे मी सरकारसोबत तहच करतोय, त्यांनी आमच्या पदरात काहीच टाकलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. याबाबत बोलताना जरांगे पाटलांच्या पत्नी म्हणाल्या की, सरकारमधील मंत्र्यांनी त्यांची समजूत काढणे, ही मंत्र्यांची मोठी चूक आहे. त्यांनी त्यांची चूक आपल्या मनात ठेवावी. कारण जरांगे गेली २२ वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. हे मंत्र्यांनीही समजून घेे गरजेचे आहे. मतदान जवळ आले की मंत्री घरोघरी चकरा मारतात. पण आम्ही महाराष्ट्रातील अखंड मराठ्यांसाठी हे उपोषण करत आहोत.