संदीप टुले
केडगाव : प्राथमिक शाळेतील शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा बोजा वाढत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे शिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ दौंड तालुक्यातील शिक्षकांनी शिक्षक दिनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला.
याबाबत बोलताना शिक्षक नेते विकास शेलार म्हणाले की, वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण, माहितीचे संकलन, अनेकविध परीक्षा यामुळे शिक्षक त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच राहिलेला नाही. शिक्षकाची नेमणूक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षकांकडे वेळच नाही. अध्यापनापेक्षा इतर कामांसाठी शिक्षकांना जास्त वेळ द्यावा लागतो. याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होताना दिसत आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली की पुन्हा शिक्षकांनाच जबाबदार धरले जाते. त्यामुळे या गंभीर बाबीचा शासनाने विचार करून, अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राज्यातील सुमारे तीन लाख शिक्षक सहभागी झाल्याचे शिक्षक नेते विकास शेलार यांनी सांगितले.