लहू चव्हाण
पाचगणी, (सातारा) : जालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध म्हणून मंगळवारी (दि.5) पाचगणी शहर बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन सकल मराठा समाज पाचगणी व परिसराच्या वतीने पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांना देण्यात आले.
जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. यात अनेक आंदोलनकर्ते, महिला, युवक जखमी झाले. या अमानवी अत्याचाराविरोधात पाचगणी शहर मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन पाचगणी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी व परिसरातील व्यापाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज पाचगणी व परिसराच्या वतीने करण्यात आले.