पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) कायम कर्मचाऱ्यांना सरसकट दहा टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही पगारवाढ १ जानेवारी २०२१ पासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा मागील १९ महिन्यांचा फरक मिळणार आहे.
या निर्णयानुसार दरमहा किमान तीन हजार दोनशे रुपये ते, कमाल पंधरा हजार रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. या निर्णयाचा सुमारे एक हजार दोनशे कर्मचाऱ्यांना लाभ होणार असल्याची माहिती बँकेचे संचालक रवींद्र जोशी यांनी दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ज्येष्ठ संचालक रमेश थोरात आदींच्या सूचनेनुसार बॅंकेच्या संचालक मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा दर तीन वर्षांनी बॅंक व कर्मचाऱ्यांमध्ये करार होत असतो. याआधी २०१९ मध्ये करार झाला होता. दरम्यान, यंदा जाहीर केलेली पगारवाढ ही येत्या ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कायम राहणार असल्याने जानेवारी २०२४ पासून नवीन पगारवाढ मिळणार असल्याचेही जोशी यांनी सांगितले.