Pune News : पुणे : शहरातून तडीपार केलेले असताना देखील शहरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या समर्थ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रास्ता पेठेतील मनुशाह मस्जिदीजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. सुमित फ्रँकी हॉल (वय ३०, रा. पुणे कॅम्प) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
समर्थ पोलिसांची कामगिरी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत होते. (Pune News) या वेळी एक संशयित व्यक्ती रास्ता पेठेतील मनुशाह मस्जिदीजवळ उभी असून, त्याच्याकडे गोणीमध्ये काही वस्तू असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, या माहितीवरून, पोलीस अंमलदार रहीम शेख व हेमंत पेरणे यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता, एक संशयित व्यक्ती हातात गोणी घेऊन उभी असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच आरोपी गोणी टाकून पळून जावू लागला. (Pune News) पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन, त्याला ताब्यात घेतले.
आरोपीला पोलीस ठाण्यात आणून गोणीतील सामानाबाबत विचारणा केली असता, त्याने हे साहित्य रेडचिल्ली हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या बंद भंगाराच्या गोडावूनमधून चोरल्याचे सांगितले. (Pune News) आरोपीचे पोलीस रेकॉर्ड तपासले असता, सुमित हॉल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध कलमांतर्गत १४ गुन्हे दाखल आहेत.
आरोपीला पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार असताना त्याने शहरात घरफोडीचा गुन्हा केल्याचे निदर्शनास आले आहे.