उरुळी कांचन, (पुणे) : दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळ आयोजित ‘सोरतापवाडी गणेश फेस्टिव्हल २०२२’ चा शुभारंभ बुधवारी (ता. ३१) ऑगस्टपासून होत असून, मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवातही प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रभर गाजलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपलब्ध करून दिल्याने फेस्टिव्हलची धूम प्रेक्षकांना अनुभवास मिळणार आहे.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या वतीने ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या काळात आयोजित “सोरतापवाडी गणेश फेस्टिवल २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार निलेश राणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक सुदर्शन चौधरी यांनी दिली.
या फेस्टिवलमध्ये बुधवारी (ता. ३१) श्रींची प्रतिष्ठापना संध्याकाळी ७ वाजता करण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ०१) सकाळी कार्यक्रमाचे उद्घाटन व संध्याकाळी खेळ रंगला वहिनींचा होम मिनिस्टर, शुक्रवारी (ता. ०२) संध्याकाळी ऑर्केस्ट्रा, शनिवारी (ता. ०३) प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान, रविवारी (ता. ०४) डान्स व मिमिक्री स्पर्धा, सोमावारी (ता. ०५) संतोष पवार प्रस्तुत नाटक सुंदरा मनात भरली. मंगळवारी (ता. ०६) प्रसिद्ध लावण्यांचा कार्यक्रम तुमच्यासाठी काय पण, बुधवारी (ता. ०७) हा जल्लोष महाराष्ट्राचा, गुरुवारी (ता. ०८) प्रसिद्ध कीर्तनकार हभप रामराव महाराज ढोक यांचे संपूर्ण कीर्तन, शुक्रवारी (ता. ०९) भव्य विसर्जन मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.