लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर एका चारचाकी गाडीने दुचाकीला भरधाव वेगाने धडक दिल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी कॉर्नर चौकात आज सोमवारी (ता. २९) सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दैव बलवत्तर असल्याने जेष्ठ नागरिकाचे प्राण वाचले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
सुर्यकांत उर्फ तानाजी शनैश्वर चव्हाण (वय-६२, व्यवसाय – दुध धंदा, रा. रामा कृषी कंपनीच्या पाठी मागे लोणी काळभोर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुर्यकांत उर्फ तानाजी चव्हाण हे दुग्ध व्यावसायिक आहेत. ते लोणी काळभोर परिसरात दुध पोहचविण्याचे काम करतात. चव्हाण हे नेहमीप्रमाणे सोमवारी (ता.२९) सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास लोणी गावात दुध देण्यासाठी दुचाकीवरून चालले होते. चव्हाण हे पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी कॉर्नरकडून लोणी गावाच्या दिशेने जात असताना, लोणी गावाकडून उरुळी कांचनच्या दिशेने जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता कि, सुर्यकांत उर्फ तानाजी चव्हाण यांनी पुणे सोलापूर महामार्गावर ५ ते ६ पलट्या मारल्या. दैव बलवत्तर असल्याने चव्हाण यांचे प्राण वाचले आहे. विशेष म्हणजे कारचालक मागे न पाहता, कोणतीही मदत न करता भरधाव वेगाने उरुळीकांचनच्या दिशेने निघून गेला. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करीत आहेत.
दरम्यान, गेल्या आठवड्यात लोणी स्टेशन येथे दोन बहिणींचा व एमआयटी कॉर्नर येथे एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाने उपाययोजना केल्या आहेत. मात्र वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे लोणी काळभोर येथील अपघाताचे सत्र कधी थांबणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.