Nagar News : अहमदनगर : बारामती येथे कामासाठी जाण्यासाठी नगर शहरातील कायनेटिक चौकात गाडीची वाट पाहत थांबलेल्या चार कामगारांना जबर मारहाण करत त्यांना लुटण्यात आले. या दरोड्यातील टोळीला कोतवाली पोलिसांनी तब्बल ५ किलोमीटर पाठलाग करून अवघ्या दोन तासात अटक केली आहे.
चार कामगारांना जबर मारहाण
स्वप्नील बाबुराव साळवे (वय २९ वर्ष), निरज रवी पटारे (वय १९ वर्ष), रितेश सुरेश शेंडगे (सर्व रा. शाहुनगर केडगाव अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पवन सुरेश पैठणे (रा. तपोवन गोंधन, ता.जाफराबाद जि. जालना) याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पवन सुरेश पैठणे, किरण रामेश्वर गोफणे, अजय लक्ष्मण गोफणे, गोविंद दादाराव गोफणे असे मारहाण झालेल्या कामगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवन सुरेश पैठणे व त्याचे मित्र किरण रामेश्वर गोफणे, अजय लक्ष्मण गोफणे, गोविंद दादाराव गोफणे हे कामगार बारामती येथे कामाला जाण्यासाठी कायनेटिक चौकात वाहनाची वाट पाहत मंगळवारी (ता. २९) रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास थांबले होते. दरम्यान, मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास सहाजण तिथे रिक्षामधून (एमएच १२ बीडी ४६१३) आले. आरोपी राहुल डावरे याने पवन पैठणे यांच्या तोंडावर फाईट मारुन गळ्यातील साखळी, खिशातील मोबाईल व दोन हजार रुपये रोख काढून घेतले. त्यानंतर आरोपी रितेश सुरेश शेंडगे, निरज रवी पटारे या दोघांनी गोविंद गोफणे याला मारहाण करुन त्यांचा मोबाईल फोन खिशातून काढून घेतला. तर प्रीतम उर्फ पेप्या सावंत (रा.मोहिनीनगर, केडगाव) याने कोयत्याने तुमचे हातपाय तोडून टाकील, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी रिक्षामधून पळून गेले होते.
याप्रकरणी पवन पैठणे याने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून त्यांना आरोपींना पकडण्यासाठी सूचना दिल्या.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी केडगाव परिसरात असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. आरोपींना पोलीस आल्याची चाहूल लागताच, आरोपींनी रिक्षातून पळ काढला. कोतवाली पोलिसांनी तब्बल ५ किलोमीटर पाठलाग करून ३ आरोपींना अटक केली आहे. तर गुन्ह्यातील आरोपी प्रीतम उर्फ पेप्या सावंत (रा.मोहिनी नगर केडगाव, अहमदनगर) हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.
ही कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक फौजदार अशोक सरोदे, पोलीस कॉन्स्टेबल याकुब सय्यद, तानाजी पवार, सोमनाथ मुरकुटे, प्रशांत बोरुडे, मधुकर चव्हाण, सत्यम शिंदे, योगेश ठोंबे, होमगार्ड पाटसकर, होमगार्ड मुर्तुजा सव्यद, होमगार्ड शिंदे यांच्या पथकाने केली आहे.