घोडेगाव (पुणे) : पुणे जिल्ह्यातील घोडेगावसह परिसरात गुरुवारी दिवसभरात दोनवेळा भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे साडेचारच्या सुमारास हा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे अनेक लोक रस्त्यावर येऊन थांबले होते; मात्र, कुठेही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती आहे.
घोडेगावसह परिसरात भूकंपाचे धक्के जाणवल्याने स्थानिक तहसीलदारांनी गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. पहाटे झोपत हे धक्के जाणवल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पासरले. या भूकंपाची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांना गावांना भेटी देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार चिंचोली गावात ग्रामस्थांची बैठक घेऊन जाणवलेल्या धक्क्यांची माहिती लोकांकडून समजून घेतली.
पुणे वेधशाळेत नोंद नाही
पहाटे जाणवलेल्या धक्क्यांबाबत पुणे वेधशाळेत चौकशी केली असता त्यांच्याकडे नोंद नाही. आंबेगाव तालुक्यात जाणवलेल्या धक्क्यांची तीव्रता कमी असली तरी वेधशाळेशी संपर्क साधून याचा अभ्यास केला जाईल. भूकंपाचे धक्के ही नैसर्गिक आपत्ती आहे. यामध्ये कोणाचे काही नुकसान झाल्यास प्रशासनाला कळवा. ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार नागटिळक यांनी केले.