लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करावे की नको या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. २९) विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कदमवाकवस्तीच्या विद्यमान सरपंच गौरी गायकवाड यांनी नगरपंचायत व्हावी यासाठी सोशल मिडीयासह विविध प्लॅटफॉर्मच्या आधारे जोर लावला आहे. तर माजी सरपंच नंदकुमार काळभोर यांच्या गटाने मात्र जैसे थे परीस्थिती रहावी यासाठी जोर लावला आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक तोंडावर आली असतानाच, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करावे की नको या प्रश्नावरुन कदमवाकवस्तीचे राजकारण चांगलेच तापले आहे. उद्याच्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करावे की नको या विषयावर ग्रामस्थांचा कल जाणुन घेतला जाणार असुन, या कल चाचणीत आपल्याच विचाराचा विजय व्हावा यासाठी विद्यमान सरपंच गौरी गायकवाड व माजी सरपंच नंदकुमार काळभोर या दोन्ही गटांनी साम, दाम व दंड वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळुन निघाले आहे.
शिरूर आणि हवेली तालुक्यात मागिल दहा वर्षातील नागरीकरणाचा वेग लक्षात घेऊन, विद्यमान आमदार अशोक पवार यांनी उरुळी कांचनचे रुपांतर नगरपरिषदेत तर लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) या दोन्ही ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करावा अशी मागणी विधानसभेत केली होती. या तीनपैकी केवळ उरुळी कांचन ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपरीषदेत करण्याबाबतचा ठराव ग्रामसभेत पास करुन, शासनाकडे पाठवला आहे.
तर लोणी काळभोर ग्रामपंचायतीवर आमंदार अशोक पवार यांच्या विचारांच्या गटाची सत्ता असतांनाही, संबधित ग्रामपंचायतीने याबाबत ठराव करण्यास चालढकल चालवली आहे. तर वरील विषयाबाबत निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी उद्या (सोमवारी) कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची ग्रामसभा होणार आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीवर सध्या भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्या गटाची सत्ता आहे. चित्तरंजन गायकवाड यांच्या पत्नी गौरी गायकवाड या विद्यमान सरपंच असुन, साडेचार वर्षापुर्वी त्या थेट जनतेमधुन निवडुन येऊन सरपंच झालेल्या आहेत. तर विरोधी गटातील बहुतांश नेते व कार्यकर्ते हे आमदार अशोक पवार यांच्या विचारांचे असल्याचे दिसुन येत आहे.
आमदार अशोक पवार हे कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रुपांतर व्हावा यासाठी विधानसभेत पाठपुरावा करीत असतांना, त्यांचाच गट मात्र आमदार पवार यांच्या निर्णयाला कडाडुन विरोध करत असल्याचे चित्र कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत दिसुन येत आहे. तर ग्रामपंचायतमधील विद्यमान सत्ताधारी गट आमदार यांच्या विचारांच्या विरोधातील असुनही, त्यांच्या निर्णयाला साम, दाम व दंड वापरुन पाठींबा देत आहे.
ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत व्हावे याबद्दल आपले मत मांडतांना सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, कदमवाकवस्तीची लोकसंख्या साठ ते सत्तर हजाराच्या आसपास पोचली आहे. वाढते नागरीकरण व ग्रामस्थांना मिळणाऱ्या सोईसुवधा लक्षात घेऊनच, आमदार पवार यांनी उरुळी कांचनचे रुपांतर नगरपरिषदेत तर लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) या दोन्ही ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करावा अशी मागणी विधानसभेत केली होती.
पक्षीय विचार वेगळे असतांनाही, ग्रामस्थांना मिळणाऱ्या सोईसुविधा लक्षात घेऊन, आम्ही आमदार पवार यांच्या मागणीला पाठींबा दिला आहे. नुसता पाठींबा देऊनच थांबले नाही तर, नागरीकांनी आमदार पवार यांच्या मागणीला पाठींबा द्यावा यासाठी पाठपुरावा करत आहोत. विरोधक केवळ टॅक्स वाढेल याची भिती घालून, नागरीकांना ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी भडकावत आहेत. मात्र,कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील नागरीक सुजान असल्याने व त्यांनाही कदमवाकवस्तीचा चौफेर विकास व्हावा. असे वाटत असल्याने, उद्या आमच्या बाजुने कल देतील असा विश्वास आम्हाला आहे.
तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करु नये. या बाबत बोलतांना माजी सरपंच नंदकुमार काळभोर म्हणाले, आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत मागणी केलेली असली तरी, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्यास आमचा ठाम विरोध आहे. नगरपंचायतीत रुपांतर झाल्यास, टॅक्स मोठ्या प्रमानात वाढण्याबरोबरच, नगरपंचायतीच्या कारभारावर शासनाचा थेट कन्ट्रोल असल्याने नागरीकांना विविध सवलती मिळवताना त्रास होणार आहे. नागरीकांच्या हिताचा विचार करुनच, आम्ही विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपंचायतीच्या मुद्द्यावरुन आजी-माजी सरपंचात फाईट, मात्र ग्रामपंचायत हद्दीतील राजकीय वातावरण मात्र टाईट…
कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या मागील दोन ग्रामसभेत वरील विषयावरुन, आजी-माजी आमदार गटाच चांगलेच वातावरण तापले होते. उद्याच्या ग्रामसभेत थेट नागरीकांचा कल जाणुन घेतला जाणार असल्याने, दोन्ही गटांनी साम, दाम व दंड वापरण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही गटांनी आपलाच विचार रेटण्यासाठी, सोशल मिडीयासह विविध प्लॅटफॉर्मच्या आधारे जोर लावला आहे. यामुळे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील वातावरण चांगलेच गरम झाले आहे.