Pune News : पुणे : चांद्रयान ३ या मोहिमेचा आज महत्वाचा टप्पा आहे. देशाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी विक्रम लँडरकडून सकारात्मक संदेश आला, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला आहे. लँडिंगच्या दोन तास आधी लँडिंग मॉड्युलची तपासणी केली जाईल. नंतर हे यान लँड होईल. हे लँडिंग पाहण्यासाठी अवघे भारतीय उत्सुक आहेत. लँडिंग पाहण्यासाठी पुणेकरांसाठी खास सोय करण्यात आली आहे. पुण्यात ठिकठिकाणी चांद्रयान ३ चे लँडिंग पाहण्यासाठी आयोजन करण्यात आले आहे.
चांद्रयान ३ चे लँडिंग पाहण्यासाठी आयोजन
काही शाळा, महाविद्यालयांमध्ये आणि खासगी संस्थांमध्ये ‘चांद्रयान ३’चे लॅन्डिंग पाहण्याची सोय पुणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘एनसीआरए’ सभागृहात देखील संध्याकाळी ६ वाजता मोठ्या पडद्यावर हे लँडिंग पाहण्याची सोय करण्यात आली आहे. सदाशिव पेठेतील टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमध्येही हजारो विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान ३’चे लँडिंग लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. याठिकाणी दुपारी ४ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल. लॉ कॉलेज रोडवरच्या एनएफएआय या संस्थेमध्येही ‘चांद्रयान ३’चे लँडिंग पाहता येणार आहे. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना ‘चांद्रयान ३’चे लँडिंग पाहण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. Pune News
भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक घालण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मंदिरात आज पहाटे अभिषेक करण्यात आला. दूध, दही, विविध फळांचे रस, सुकामेवा आणि इतर वस्तूंच्या सहाय्याने हा अभिषेक करण्यात आला. या वेळी गणपती बाप्पांच्या मुकुटावर चंद्रकोर लावून भालचंद्र शृंगार करत, बाप्पाला सजवण्यात आलं होतं. Pune News
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, विक्रम लँडरचे लँडिंग ठरलेल्या वेळेतच होणार असून, लँडरच्या सर्व यंत्रणा अपेक्षेप्रमाणे काम करीत आहेत. बेंगळुरू येथील मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्समधील (मॉक्स) सर्व शास्त्रज्ञ उत्साहात असून, लँडिंगच्या प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत.