संदीप टूले
केडगाव, ता.२० : भाजपचे सरकार म्हणजे भ्रष्टाचारी जुमला सरकार आहे. या सरकारवर पुन्हा विश्वास ठेऊ नका. या सरकारने फक्त घरं फोडायचे काम केले, अशी घणाघाती टीका बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
खासदार सुळे या दौंड तालुक्याच्या गावभेट दौरा करत आहेत. मलठण येथील गावभेट दौऱ्यादरम्यान सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, माजी नगराध्यक्ष बादशाह शेख, सोहेल खान, माजी सभापती ताराबाई देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे चिन्ह चोरले, पक्षाचे नाव चोरले हे सरकार सर्वसामान्यांचे नसून हे सरकार ईडीचे सरकार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर ईडीने १०९ वेळा धाडी टाकल्या. एवढ्या वेळा ईडीने व भाजपच्या सरकारने देशमुख यांना नाहक त्रास दिला. सत्ता असो किंवा नसो पवार कुटुंबाने कधीही कोणालाही नाहक त्रास दिला नाही.
खोट्या केसेस करण्याचे पाप पवार कुटुंब कधीही केले नाही. हे पाप फक्त भाजपचे सरकार करत आहे. कितीही खोट्या केसेस केल्या आणि ईडीच्या दुरुपयोग करून धाडी टाकल्या तरी पवार कुटुंब असल्या दबावाला कधीही बळी पडणार नाही. तसेच मणिपूरमधील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. परंतु, भाजपचे सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही खासदार सुळे यांनी केला.
यावेळी शिवसेनेचे शरद सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा जयश्री भागवत, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, राष्ट्रवादी युवकचे सचिन काळभोर, मा. सरपंच उज्वला शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार सुळे यांच्या दौऱ्याकडे दौंड तालुक्यातील बड्या नेत्यांनी फिरवली पाठ
सुप्रिया सुळे यांनी जेव्हा जेव्हा दौंड तालुक्याचा दौरा केला, तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, महानंदा संघाच्या माजी अध्यक्षा वैशाली नागवडे, दौंड शुगरचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्यासह माजी आमदार रमेश थोरात गटाचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी असायचे. मात्र, माजी आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या शनिवारी झालेल्या दौऱ्याकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.