Daund News : पाटस : छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे पुरोगामी चळवळीतील अग्रेसर असणारे विचारवंत व ज्येष्ठ साहित्यिक निसर्गवासी दिवंगत प्रा. हरी नरके व विद्रोही गायक गदर यांना पाटस येथे दौंड तालुक्यातील पुरोगामी संघटना कडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
पुरोगामी संघटनेच्या वतीने शोक सभेचे आयोजन
ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा.हरी नरके यांचे नुकतेच निधन झाले आहे. प्रा. हरी नरके यांचे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीत मोठे योगदान आहे. महात्मा फुले साहित्यिकांचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले असून अनेक ठिकाणी फुले शाहू आंबेडकर यांच्यावर व्याख्याने दिली आहेत. महात्मा फुले समता परिषद या सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक आणि कार्यकर्ते होते.
काही दिवसांपूर्वी हरी नरके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांना अखेरची श्रद्धांजली म्हणून दौंड तालुक्यातील पुरोगामी संघटनेच्या वतीने पाटस येथील भाग्यसंकेत मंगल कार्यालयात शोक सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. नरी हरी नरके व विद्रोही गायक गदर यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कार्यास अभिवादन केले. तसेच त्यांनी जिवंत ठेवलेली फुले शेव आंबेडकर यांचे कार्य व पुरोगामी चळवळ एकत्र येऊन पुढे अशीच चालू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यावेळी सत्यशोधक ओबीसी महासंघाचे रामचंद्र भागवत, ओबीसी नेते पांडुरंग मेरगळ, बामसेफचे कुमार काळे, भीमा पाटस कारखान्याचे संचालक बाळासाहेब तोंडे पाटील, समता परिषदेचे संदीप भागवत, आरपीआयचे नवनाथ गायकवाड, दौंड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विजयराव चव्हाण तसेच सत्यशोधक ओबीसी महासंघ, मौर्य क्रांती महासंघ, दौंड तालुका समता परिषद,फुले ब्रिगेड.सावता परिषद, माळी सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, दौंड तालुका वंचित बहुजन आघाडी ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट दौंड, डी एन बी ग्रुप,दौंड पत्रकार श्रमिक संघ आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या शोकसभेस उपस्थित होते. (Daund News)