Health News : जसं जसं वय वाढत जाते तशी आपली शारीरिक हालचाल आणि बौद्धिक क्षमता कमी होते. आपला आहार आणि व्यायामाच्या अभावामुळे आपल्या उतारवयातील आरोग्यावर परिणाम होत असतो. वाढत्या वयानुसार, आपली स्मरणशक्ती, आकलनशक्ती कमी होण्याला ‘मानसिक वार्धक्य’ म्हणतात.
सुरुवातीच्या रिसर्चमध्ये आहार आणि बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांचा वय वाढीवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, नवीन संशोधनातून असे समोर आले की, तणावग्रस्त जीवन अनुभवलेल्या लोकांमध्ये मानसिक वार्धक्याची तीव्रता जास्त असते. तरुणपणी तणावपूर्ण नोकरी, मानसिक तणावात्मक अनुभवांना सामोरे जावे लागले तर त्याचे अनिष्ट परिणाम वृद्धापकाळात पाहायला मिळतात.
तणाव निर्माण करणाऱ्या अनेक बाबींचा यावेळी विचार करण्यात आला. जसे की, जवळच्या व्यक्तीचे जाणे, मानसिक आजार, सामाजिक सवयी किंवा भौगोलिक स्थलांतर अशा अनेक कारणांमुळे जीवन स्ट्रेसफुल बनते. कठीण जीवन जगलेल्या 60 ते 80 वयोगटातील वृद्ध लोकांचा अभ्यास करता असे लक्षात आले की, तरुण असताना सामान्य, आनंदी जीवन जगलेल्या लोकांच्या तुलनेत त्यांचे मानसिक आरोग्य खालावलेले होते.
विशेष म्हणजे, तरुणपणी अशा तणावाचा आपल्या मेंदूवर काही परिणाम होत नाही. मात्र, जसे वय वाढते, तसे परिणाम दिसू लागतात. त्यामुळे म्हातारपणी आनंदी, स्वच्छंदी, निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आजपासूनच तणावापासून दूर राहा. खेळणे, व्यायाम, छंद, ध्यान, उत्तम आहार, प्रेम या गोष्टी आपला स्ट्रेस तणाव कमी करतात.