संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे चोऱ्या, घरफोड्या होत असल्याचे समोर येत आहे. रात्री होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. असाच एक घरफोडीचा प्रकार भांडगाव येथे घडला असून, या घरफोडीमध्ये सुमारे 4 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
आदीसाई हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या माधुरी संतोष दोरगे यांच्या घरात चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा फिर्यादी यांच्या घराच्या बाहेरील दरवाज्याचे कुलूप तोडून घराच्या आतमध्ये प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी घरात असलेल्या लाकडी कपाटामध्ये फिर्यादी यांनी त्यांच्या आई, वडिलांचे ठेवलेले सोन्या, चांदीचे दागिने व कागदपत्र असा एकूण 4 लाख 65 हजार रुपयांचा माल घरफोडी करून चोरून नेला.
भांडगावसारख्या गजबजलेल्या ठिकाणी दिवसाढवळ्या इतकी मोठी घरफोडी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढायला लागले आहे. चोरट्यांची गजबजलेल्या परिसरातील चोरी करण्याची मजल गेली असून, यवत पोलिसांनी त्वरित अशा चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मदने करत आहेत.