पुणे : वैद्यकिय देवकामध्ये त्रुटी न काढता फाइल पुर्ण करून देण्याकरीता ३ हजार रुपयांची लाच मागून अडीज हजार रुपये स्वीकारताना ससून रुग्णालयाच्या अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
गणेश सुरेश गायकवाड (वय-४९, वरिष्ठ लिपीक (वर्ग-३), अधीक्षक कार्यालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे) असे रंगेहाथ पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तक्रारदार या शासकीय सेवक असून त्यांचे १ लाख ७ हजार रुपयांचे वैद्यकिय देयक फाईल मंजुर करण्याकरिता ससून रुग्णालयाच्या अधीक्षक कार्यालयाच्या वैद्यकिय आवक जावक सादर करण्यात आली होती.
सदर वैद्यकिय देयकामध्ये त्रुटी न काढता फाइल पुर्ण करून देण्याकरीता आरोपी गणेश गायकवाड यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. आणि तडजोडीअंती अडीज हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
मिळालेल्या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ससून रुग्णालयाच्या अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून अडीज हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी गणेश गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.