Indapur News : इंदापूर : आदिवासी समाज आजपर्यंत नागरी सुविधांपासून वंचित राहिला आहे. आता शासकीय नोकऱ्यांमध्ये या समाजाला आरक्षण आहे. समाजासाठी संसदेत देखील राखीव जागा आहेत. या समाजातील युवक-युवतींनी संधीचा फायदा घेऊन आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्याबरोबरच आपले भविष्य उज्ज्वल केले पाहिजे, असे आवाहन न्यायमूर्ती एस. एस. साळुंखे यांनी केले.
युवक-युवतींनी संधीचा फायदा घ्यावा…
इंदापूर येथील जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायमूर्ती एस. एस. साळुंखे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती साळुंखे बोलत होत्या. या वेळी आय. एम. ई.च्या अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे, डॉ. अविनाश पाणबुडे, डॉ. समीर मगर, डॉ. गीता मगर, मैत्रीण ग्रुपच्या प्रमुख अनुराधा गारटकर, सायरा आत्तार, अनिता खरात, मंगल ढोले, उज्वला चौगुले, संस्थेचे अध्यक्ष जयंत नायकुडे, सचिव लता नायकुडे, खजिनदार उर्मिला नायकुडे, संस्थेच्या प्राचार्या अनिता मखरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (Indapur News)
या कार्यक्रमात बोलताना डॉ. अविनाश पाणबुडे म्हणाले की, १९९४ साली संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करावा, असे सुचित केले होते. आदिवासी समाजाच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जात आहे. ३७ कोटी आदिवासी जगभरात आहेत. त्यापैकी भारतात ८.७ टक्के समाज आहे. राज्यात कोकण, धुळे, नंदुरबार आदी भागांत हे मूळनिवासी राहत आहेत. राज्यातील विकसित भागांमध्ये नागरी सुविधा-सेवा मिळतात. मात्र, आदिवासी समाजातील लोक शैक्षणिक, सामाजिक सुविधांपासून वंचित राहिले आहेत. त्यांच्यापर्यंत विकास पोहचवला पाहिजे. (Indapur News)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत नायकुडे यांनी केले. आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नृत्य, विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा दाभाडे, प्रीती जांबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामचंद्र वाघमोडे, नवनाथ काथकडे, तेजस्विनी शिंदे, अमर प्रभे आदींनी विशेष प्रयत्न केले.