लोणी काळभोर (पुणे) – जावजीबुवाचीवाडी (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील होलेवस्ती प्राथमिक शाळेत आत्महत्या केलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अरविंद देवकर या शिक्षकांचे शविच्छेदन तब्बल आठ तासानंतर झाल्याचा संतापजणक प्रकार पुढे आला आहे. लोणी काळभोर, हडपसर व यवत या तीन पोलिस ठाण्यांच्या “हद्द” वादामुळे अरविंद देवकर यांचे शवविच्छेदन रखडल्याचा आरोप, अरविंद देवकर यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
जावजीबुवाचीवाडी (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील होलेवस्ती प्राथमिक शाळेतील दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी जवळच्याच दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतल्याच्या कारणावरुन, त्या शाळेतील शिक्षक अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय ४६, रा. निसर्ग सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ – मावडी पिंपरी ता. पुरंदर) यांनी सहा दिवसापुर्वी शाळेतच विषारी तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचे उपचारादरम्यान मंगळवारी (ता. ८) सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास मृत्यु झाला. मृत्यु सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास झाला असला तरी, शवविच्छेदन मात्र सायंकाळी सात नंतर झाले.
जावजीबुवाचीवाडी (ता.दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील होलेवस्ती येथील एकशिक्षकी प्राथमिक शाळेत अरविंद देवकर यांनी गुरुवारी (ता.३) शाळेतच विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विषारी तणनाशक अंगात मोठ्या प्रमाणात भिनल्याने त्यांच्यावर सुरुवातीला उरुळी कांचन येथे उपचार करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर पाच दिवसांनी देवकर यांचा हडपसर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी (ता.८) सकाळी अकराच्या सुमारास मृत्यू झाला.
अरविंद देवकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन व्हावे व त्यांच्या मृतदेहावर लवकर अंत्यसंस्कार व्हावेत. यासाठी देवकर यांचे नातेवाईक हडपसर पोलीस ठाण्यात आले. तेव्हा हडपसर पोलिसांनी सीमावादामुळे तुम्ही लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क करा, असे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून एमएलसीसंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी लोणी काळभोर पोलिसांना एमएलसी कळविली आहे, अशी माहिती मिळाली.
कर्मचारी बाहेर, आल्यानंतर पाठवून देतो; पोलिसांकडून उत्तर..
हडपसर पोलिसांच्या सुचनेनुसार, देवकर यांच्या नातेवाईकांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी पण हात वर केले आणि आत्महत्येचा प्रयत्न जावजीबुवाचीवाडी (ता. दौंड) येथे झाला असल्याने, लोणी काळभोर पोलिसांनी देवकर यांच्या नातेवाईकांनी यवत पोलिसांशी संपर्क करा असे सांगितले. यावर देवकर यांच्या नातेवाईकांनी यवत पोलिसांशी संपर्क केला तेव्हा त्यांनी ‘कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेले आहेत. आल्यानंतर पाठवून देतो’, असं उत्तर देत फोन ठेवला. हडपसर, लोणी काळभोर व यवत पोलिसांशी संपर्क करुनही पोलिस येत नसल्याचे पाहुन, देवकर यांच्या नातेवाईकांनी आपल्या ओळखीच्या राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
राजकीय पदाधिकाऱ्यांना संपर्क साधुनही, पोलिस तीन तासाहुनही अधिक काळ रुग्णालयात आलेच नाहीत. त्यानंतर देवकर यांच्या नातेवाईकांनी एका राजकीय पदाधिकाऱ्यांमार्फत पुन्हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उरुळी कांचन चौकीच्या अंतर्गत येत असल्याने तेथील पोलीस कर्मचारी पाठवून देतो, असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मात्र हडपसर व लोणी काळभोर या दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी कार्यवाही करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यामुळे अरविंद देवकर यांच्या पार्थिवावर दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.९) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मूळ गावी मावडी पिंपरी (ता. पुरंदर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
वरिष्ठांनी दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी..
‘पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेह रुग्णालयात तब्बल ८ तासांपेक्षा जास्त वेळ तसाच पडून होता. आमचे चुलते अरविंद देवकर हे गेल्याचे दु:ख असतानाही आम्हाला पोलिस प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही. आमचे चुलते हे एक नावाजलेले शिक्षक होते. त्यांच्यावरच अशी वेळ आली असेल तर सामान्यांचे काय? शवविच्छेदन मंगळवारीच झाले असते तर आम्ही त्याचदिवशी अंत्यसंस्कार करणार होतो. मात्र, पोलिसांच्या दिरंगाईमुळे अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यां दिरंगाईबाबत चौकशी करून संबंधित दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी’, अशी मागणी अरविंद देवकर यांचे पुतणे प्रणव देवकर यांनी केली आहे.