Shirur News : शिरूर : पैसा असेल तेथे सत्ता आणि सत्ता असेल तेथे पैसा… हे जणू समीकरणच झाले आहे. जनतेने आपले बहुमूल्य मत देऊन निवडून दिलेले लोकप्रतिनिधी एकदा का खूर्चीत बसले, की जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, हे आता सर्वसामान्य जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे. अनेकदा निवडणूका जवळ आल्या की तरुणांचा वापर करून घेतला जातो. त्यानंतर या तरुणांना योग्य दिशा न मिळाल्यास ते भरकटत जातात. त्यातूनच बेरोजगारीची समस्या तरुणांसमोर आ वासून उभी ठाकली आहे. आपणच निवडून दिलेल्या खासदार, आमदारांचा खर्च देश आणि राज्याच्या तिजोरीतून होत असतो; पण तरुण वर्ग मात्र बेरोजगारीच्या जात्यात नाहक भरडला जातो. तरुणांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा या युवाशक्तीचा वापर बलाढ्य राजकीय शक्ती चुकीच्या कामांसाठी करून घेत आहे का? राजकारणात तरुण केवळ सतरंज्या उचलण्यासाठीच का? असा संतप्त सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.
उद्याच्या कामाची शाश्वती नाही
सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत शिक्षणाचा अधिकार तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. उच्च शिक्षण घेऊन अनेक युवक रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. उच्च शिक्षण घेऊन बहुतांश मुले स्पर्धा परीक्षांमधून आपले नशीब आजमावू लागली आहेत. खासगी कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असले तरी याठिकाणी खासगी ठेकेदारांनी आपले दुकान थाटले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी नोकरीला पायबंद बसला आहे. (Shirur News) ठेकेदारांपासून मिळणारी नोकरी ही देखील काही काळापूरती मर्यादीत स्वरूपाची झाली आहे. त्यामुळे कामाला ब्रेक देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. परिणामी उद्याच्या कामाची शाश्वती या तरुणांना राहिलेली नाही. त्यातून काही ठिकाणी संप, टाळेबंदी होऊन कामे देखील ठप्प झाली आहेत. काही कारखान्यांनी कामगारांचा पगार थकवल्याने या युवा वर्गात संतापाची लाट उसळत आहे.
बेरोजगारीचा प्रश्न गंभीर
अनेकदा मनापासून काम करून देखील पगार नाही, अशीही परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगारातून देखील बेरोजगार होण्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. अशा बेरोजगारीकडे शासन अथवा राजकीय नेत्यांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. असे असले तरी देखील सध्या मोठ्या प्रमाणात लहान लहान व्यवसायाची उभारणी होऊ लागली आहे. (Shirur News) एकाच व्यवसायासाठी अनेक दुकानांची एकाच वेळी होणारी सुरवात प्रत्येक व्यावसायिकाला हानीकारक ठरणारी आहे. मागणी नसताना पुरवठा अधिक झाल्यावर अर्थशास्त्राच्या नियमाने तो व्यवसाय डबघाईला येतो. त्यातून बेरोजगारीचा प्रश्न अधिकच गंभीर होताना दिसू लागला आहे.
राजकीय सत्तांतर…
मतदारांनी आपला हक्क बजावत मतदान करायचे. त्यातून निवडून दिलेला प्रतिनिधी राजकीय पटलावर जाऊन संधी मिळेल तिथे संधीचे सोने करण्याकडे अधिक भर देताना दिसू लागला आहे. राज्यात या पंचवार्षीक निवडणूकीमध्ये प्रत्येक पक्षाला सत्तेची संधी मिळावी, असेही राजकारण होताना दिसून आले. पहिल्या अडीच वर्षांत तीन पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. नंतर आमदार फोडून सत्ता स्थापन करण्यात आली. त्यातून पुन्हा आघाडीच्या पक्षाने आमदार फोडून राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापन केली. एकाच वेळी दोन उपमुख्यमंत्री असणारे सरकार देखील पहावयास मिळाले. त्यातून गावात देखील दोन उपसरपंच असावेत, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेत तयार झाल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये प्रत्येकाला सत्तेच्या माध्यमातून संधी मिळण्याचे धोरण अवलंबले असल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या काळात तरूणाईला रोजगार या कळीच्या मुद्दावरून फसवत त्यांचे मतदान आपल्या बाजूने मिळवले. सध्या सत्ताधाऱ्यांना तरूणाईच्या बेरोजगारीचा पूर्ण विसर पडल्याचे दिसून येत आहे.
परीक्षा शूल्क माफ करा…
नोकर भरतीत तरुणाईने गंभीर होऊन परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा, यासाठी सत्ताधाऱ्यांनी परीक्षा फी एक हजार रूपयांपर्यंत वाढवली. त्यातून नोकर भरती होत असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मग अंगात कलागुण आहेत पण नोकरी नसल्याने परिस्थितीमुळे काही शिक्षण घेता येत नाही. त्यातून परीक्षा फी कुठे कुठे भरून नशीब आजमवायचे असा प्रश्न तरूणाईला पडला आहे. परीक्षेत असणारी स्पर्धा, त्यातून परीक्षा फीमध्ये वाढलेला खर्च कसा करायचा हा सवाल मोठा आहे. वर्षाला जवळपास १५ हजार रूपये परीक्षांना सामोरे जाताना या तरुणाईला करावा लागत आहे. (Shirur News) श्रीमंताची मुलेच या विविध परीक्षांना बसून उत्तीर्ण होतील. हा विचार सत्ताधारी नेते मंडळी का करत नाही, असा सवाल देखील जनसामान्यातून होऊ लागला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे फिरणाऱ्या आमदारांच्या सुरक्षेच्या गाड्यांसाठी १५० कोटी रूपये खर्च केला जातो. मग त्यांच्यावर खर्च करण्यासाठी तो खर्च तरुणांच्या परीक्षेसाठी केला पाहिजे. परीक्षा फी माफ करा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. पेपर फुटीमधून तरुणांचे नुकसान होते, याकडे लक्ष नाही. एकत्रित भरलेली कोट्यावधीची परीक्षा फी यातून कोणी त्याबाबतचा खुलासा देत नाही.
हा बेरोजगारीचा प्रश्न महाभंयकर असताना याकडे सत्ताधारी लक्ष कधी देणार, हा अभ्यासाचा विषय असून, अवाढव्य परीक्षा फी, शिवाय कंपनी अथवा संस्थामार्फत परीक्षा होऊन देखील पेपरफुटी थांबत नाही. त्यातून बेरोजगारांच्या खिशाला चाट लागत आहे. त्यांची नोकरीची संधी हुकत आहे. वेळ निघून गेल्यावर अनेक तरुण बेरोजगारीच्या विळख्यात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले. याला बेरोजगारीचा प्रश्न की राजकीय बलाढ्य शक्तीचा विजय झाला, असेच म्हणावे लागेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : ‘दुःखाच्या अश्रुंना मदतीचे बंध’देत, ते जपताहेत माणुसकीचे अजोड नाते…
Shirur News : एक हात मदतीचा … सहकारी मित्रांकडून माणुसकीचे दर्शन