संदीप टूले
Daund News : केडगाव, (पुणे) : खानवटे (ता. दौंड) येथील दोन शेतकऱ्यांचे जवळपास दोन ते तीन एकर ऊस महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे जळून खाक झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. ०७) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खानवटे येथील भिगवण-राशिन रोड लगत घडली आहे.
आधीच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, त्यात पाणी असेल तर वीज नाही. वीज असली तर पाणी नाही आणि या सगळ्याचा मेळ घालत पीकाचा हातातोंडाशी आलेला घास महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऊस जाळून खाक झाला आहे. शरद ढवळे यांचा अंदाजे दीड एकर व सिद्धेश्वर शिलवंत यांचा एक एकर असे दोन शेतकऱ्यांचे मिळून जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता शेतकरी म्हणाले की, आम्ही खाली आलेल्या ताराबाबत महावितरणला वारंवार सांगितले होते. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले व त्याचा नाहक त्रास आज आमच्या कुटुंबाला भोगावा लागला असून, महावितरणने आमचे झालेले पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी.