Pune News : पुणे : कोंढवे धावडे येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ओला उबेर चालकाचे जबरदस्तीने अपहरण करण्यात आले. खंडणी विरोधी पथकाने सांगली येथून या चालकाची सुटका केली असून, ६ जणांना अटक केली आहे. पूर्वीच्या २५ लाख रुपयांच्या व्यवहारावरुन हे अपहरणनाट्य घडल्याचे तपासाअंती उघड झाले आहे.
२५ लाख रुपयांच्या व्यवहारामुळे केले अपहरण
याबाबत पूनम वैभव जाधव (वय २६, रा. कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ६ जणांना अटक केली आहे. हा प्रकार कोंढवे धावडे येथील स्वामी चैतन्य बिल्डिंगमध्ये शनिवारी रात्री आठ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, वैभव श्रीकृष्ण जाधव (वय २७, रा. स्वामी चैतन्य बिल्डिग, खडकवस्ती, कोंढवे धावडे) असे अपहरण केलेल्या ओला उबेर चालकाचे नाव आहे. (Pune News) याप्रकरणी पोलिसांनी अक्षय मोहन पाटील (वय २८, रा. टंच सेंटर, नेपाळ, मुळ रा. घोटी खुर्द, ता. खानापूर, जि. सांगली), महेश मलिक नलावडे (वय २५), सुशांत मधुकर नलावडे (वय २८, रा. तळे वस्ती, ता. खानापूर, जि. सांगली), बोक्या ऊर्फ रंजित दिनकर भोसले (वय २६, रा. तासगाव, जि. सांगली), प्रदीप किसन चव्हाण (वय २६, रा. भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली) आणि अमोल उत्तम मोरे (वय ३२, रा. बिरंवडी, ता. तासगाव, जि. सांगली) अशी खंडणी विरोधी पथकाने सांगली येथून अटक केलेल्यांची नावे आहेत.
अक्षय पाटील याचा दिल्लीमध्ये सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. वैभव जाधव हे ओला उबेर चालक असून, ते अक्षय पाटीलकडे २०२२ मध्ये कामाला गेले होते. तेथे दोघांमध्ये २५ लाख रुपयांच्या व्यवहारावरुन वाद झाला होता.(Pune News) नंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये ते कामावरुन परत घोटी बुदु्क येथे आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील पैशांचा वाद मिटवला होता. दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता फिर्यादी पूनम या घरात असताना अक्षय पाटील दोघांना घेऊन घरात शिरला. वैभव कोठे आहे, असे विचारत धमकी दिली. वैभव घरी आल्यावर त्यांनी त्याला मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये घालून पळवून नेले. या धक्कादायक प्रकारानंतर उत्तमनगर पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली होती.
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासकार्य सुरू केले. खंडणी विरोधी पथकाच्या दोन्ही युनिटने या अपहरणकर्त्यांचा माग काढून सांगलीमधून वैभव जाधव याची सुटका केली. (Pune News) याप्रकरणी ६ अपहरणकर्त्यांना अटक केली असून, पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रोकडे, पोलीस अंमलदार रवींद्र फुलपगारे, किरण देशमुख, किरण ठवरे, उज्वल मोकाशी, राजेंद्र लांडगे, ज्ञानेश्वर तोडकर यांनी केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे मेट्रो सुसाट; एकाच दिवशी ९६ हजार प्रवाशांनी राइड करून केला नवा विक्रम!
Pune News : आता कॅब राइड रद्द होण्याची चिंता सोडा; पुण्यात ओलाची प्राईम प्लस सेवा
Pune News : अल्पवयीन मुलीवर घरात शिरून बलात्कार; २० वर्षीय आरोपीला अटक!