PM Narendra Modi पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी १ ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध नियोजित कामे करणार आहेत. यामध्ये मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणे, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचाही समावेश आहे. (PM Narendra Modi)
दरम्यान, पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर, १२.४५ मिनिटांनी ते मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. (PM Narendra Modi)
मेट्रो १ च्या दोन मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला. या वेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत (पीसीएमसी) कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे २.५ लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेस्ट टू एनर्जी मशिनचे उद्घाटन करणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १२८० हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली २६५० हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्या सुमारे ११९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.