लोणी काळभोर, (पुणे) : भारत सरकारने स्मार्ट इंडिया हॅकाथॉन हार्डवेअर एडिशनच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी पुणे ला नोडल सेंटर म्हणून नियुक्त केले आहे. या ठिकाणी २५ ते २९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत भारतातील २३ संघाचे १६० सहभागी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन मध्ये सहभागी होत आहेत. या हॅकाथॉन मध्ये वास्तविक जीवनातील तणावग्रस्त सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी त्यांच्या सर्जनशील कल्पना मांडल्या असल्याची माहिती डॉ. रेखा सुगंधी यांनी दिली.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे येथील विश्व राज स्टुडिओ येथे भारताच्या पश्चिम विभागासाठी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन ही स्पर्धा 25 ते 29 ऑगस्ट 2022 दरम्यान AICTE- मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन कौन्सिल (MIC) व एम आय टी ए डी टी युनि्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कॅपजेमिनी कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष मनीष मेहता, नीति आयोगाचे विशेष अधिकारी डॉ. के. व्यंकटनारायण आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डॉ. मंगेश कराड यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती डॉ. मोहित दुबे आणि डॉ. रेखा सुगंधी यांनी दिली. जम्मू आणि काश्मीर, आसाम, केरळ, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील स्पर्धक संघ यात सहभागी होत आहेत.”
फिटनेस आणि स्पोर्ट्स, हेरिटेज आणि कल्चर, मेडटेक, बायोटेक, हेल्थटेक, अर्ग्रीकल्चर, फूडटेक आणि रुरल डेव्हलपमेंट, रिन्युएबल आणि सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांशी संबंधित समस्या स्टेटमेंटवर काम करण्यासाठी यात सहभागी संघ 5 दिवस आणि 4 रात्री चोवीस तास काम करतील. विद्यार्थ्यांच्या इनोव्हेशन श्रेणी अंतर्गत समस्या विधाने AICTE- मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन इनोव्हेशन कौन्सिल (MIC) द्वारे प्रायोजित करण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रत्येक श्रेणीला १ लाख रुपयांच्या रोख पारितोषिकांसह ३ पुरस्कार दिले जातील. विजेत्यासाठी १ लाख, रु. प्रथम उपविजेत्यासाठी ७५ हजार आणि द्वितीय उपविजेत्यासाठी ५० हजार रुपयाचे पारितोषिक दिले जातील अशी माहिती ही डॉ रेखा सुगंधी आणि डॉ. मोहित दुबे यांनी दिली.