हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीला कागदावरच पाणीपुरवठा योजना पूर्ण आहे. प्रत्यक्षात काहीच नाही. पाणीपुरवठा योजनेची चोरी झाली तर नाही ना, असा प्रश्न उरुळी कांचन व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक आपापसात चर्चा करू लागलेत. त्यामुळे त्याची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
कदमवाकवस्ती व उरुळी कांचन ग्रामपंचायतीला नागरिकांच्या मागणीनुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून प्रास्ताविक योजना लागू केली. लोकसंख्येची वाढ लक्षात घेता कामाला मंजुरी मिळाली. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सदरची योजना कागदावरच राहिल्याने नागरिक नाराजी व्यक्त करू लागले आहेत.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ७९ कोटी ५३ लक्ष रुपयांच्या निधीची शासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती तत्कालीन सरपंच संतोष उर्फ पप्पू कांचन यांनी दिली होती. तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ८९ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या निधीची शासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती सरपंच गौरी गायकवाड यांनी दिली होती.
उरुळी कांचन येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषापेक्षा जास्त आहे. तसेच योजनेची किंमत रू ५ कोटीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सदर नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग पुणे यांनी संदर्भ क्रमांक ०९ अन्वये शासनाच्या मान्यतेकरीता सादर केला होता.
त्यानुसार कदमवाकवस्ती येथील ५५ लिटर दरडोई दरदिवशी क्षमतेच्या रुपये १० हजार ९४६ इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी शासन निर्णय पुरवठा योजनेच्या ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर संबंधित कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण/जिल्हा परिषद व संबंधित ग्रामपंचायतीचे अधिकारी यांनी योजनेची संयुक्तपणे पाहणी आयोजित करावी आणि अशा पाहणीत कोणतेही दोष आढळून आल्यास योजना ताब्यात देण्यापूर्वी ते सुधारण्यात यावेत. २ रा योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर किमान १ वर्षे योजना चालविणे कंत्राटदारावर राहील. असे परिपत्रकात म्हटले होते.
प्रस्तुत उरुळी कांचन नळ पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, पुणे तसेच सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी समितीच्या दिनांक ६ डिसेंबर, २०२१ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. नळ पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ७९ कोटी ५३ लाख २ हजार (एकोणऐंशी कोटी त्रेपन्न लाख दोन हजार फक्त) (ढोबळ) इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती. त्यानुसार हि योजना मंजूर करण्यात आली होती.
दरम्यान, या दोन्ही ग्रामपंचायतीच्या योजना पुढे का सुरु होत नाहीत. तसेच पाणी योजनेचा मुहूर्तहि सुरु न झाल्याने स्थानिकांना या उन्हाळ्यातहि पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. हि योजना तत्काळ पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा सुरु करावा अशी मागणी होत आहे.
याबाबत उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन म्हणाले, “संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. काम पुर्ण करण्याचा क्रम (वर्क ऑर्डर) झाला असून येणाऱ्या महिन्यात या कामाचा शुभारंभ होणार आहे. तसेच सदर कामाचे भूमिपूजन झाले कि, लगेच काम सुरु होणार आहे.”
याबाबत कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, “जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी व शर्तीची पूर्तता करण्याच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. काम पुर्ण करण्याचा क्रम (वर्क ऑर्डर) झाला असून येणाऱ्या महिन्यात या कामाचा शुभारंभ होणार आहे. एक महिन्याच्या आत हि योजना सुरु होणार आहे.”